श्रीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी योगसाधना केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / श्रीनगर
योगसाधनेमुळे ज्याप्रमाणे शरीर आणि मन सुदृढ होते, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेचेही सामर्थ्य वाढत आहे. ‘योगअर्थव्यवस्था’ सर्वत्र वर्धिष्णू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योगदिन जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे योगासनांची प्रात्यक्षिके करून साजरा केला. त्यांच्यासह अनेक मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
‘योगसाधना ही जगाच्या कल्याणाचे एक प्रभावी साधन आहे, हे सत्य आता जागतिक स्तरावरही मान्य करण्यात येत आहे. व्यक्ती आणि जग यांच्यातील सेतू म्हणून योग कार्य करीत आहे. योगामुळे प्रत्येक व्यक्तीला आपले हित हे आपल्या भोवतीच्या जगाच्या हिताशी जोडले गेले आहे, याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे जगभरात अधिकाधिक लोक योगाकडे आकर्षित होत असून या प्रसाराचा लाभ अर्थव्यवस्थेलाही होत आहे. त्यामुळे ‘योगअर्थव्यवस्था’ नामक नवी संकल्पना रुढ झाली असून ती जगभरात लोकप्रिय होत आहे, असे त्यांनी योगासन प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमानंतर भाषण करताना उपस्थितांसमोर स्पष्ट केले.
पावसामुळे स्थानात परिवर्तन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योगासन कार्यक्रम पूर्वनिर्धारित योजनेनुसार श्रीनगरच्या प्रसिद्ध ‘दाल सरोवर’ परिसरातील हिरवळीवर होणार होता. तथापि, सततच्या पावसाने कार्यक्रमाचे स्थान ऐनवेळी भिन्न निवडण्यात आले. त्यामुळे हा कार्यक्रम ‘शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन संकुल’च्या वास्तूत करण्यात आला. ही वास्तू दाल सरोवरानजीकच आहे. कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक नागरिकांसमवेत दाल सरोवराच्या परिसरात छायाचित्रे काढून घेतली. या नागरिकांमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. दाल सरोवराच्या रुपाने यंदाच्या योगदिनाला सुरेख पार्श्वभूमी मिळाली आहे. तसेच योगसाधना करताना निसर्गाशी सान्निध्य साधण्याची संधीही दिली आहे. पाऊस असला तरीही येथे उपस्थित असलेल्या लोकांचा उत्साह कमी झाला नाही, अशी प्रशंसा त्यांनी केली.
दडपण दूर सारण्याचे साधन
भूतकाळाच्या ओझ्याखाली न राहता वर्तमानातील क्षण आनंदाने जगण्याचे योग हे एक महत्त्वाचे साधन आहे. आपल्या ठायी शांतीची स्थापना करण्याचे सामर्थ्य योगात आहे. आपले अंत:करण शांत असेल तर साऱ्या जगावरही आपला सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
साधकांच्या संख्येत सातत्याने वाढ
जगात योगसाधकांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मी ज्या ज्या स्थानी जातो, तेथे सर्वसाधारणपणे प्रत्येक नेता योगाच्या लाभासंबंधी माझ्याशी चर्चा करतो. अनेक देशांमध्ये योगसाधना ही लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेली आहे. तुर्कमेनिस्तान, सौदी अरेबिया, मंगोलिया, जर्मनी आदी देशांमध्येही योगाचा विलक्षण प्रसार झाला आहे. प्राचीन प्रार्थना पद्धतीही जगात झपाट्याने लोकप्रिय होत आहे, अशी प्रशंसा त्यांनी भाषणात केली.
भारतात पर्यटनात वृद्धी
योग या भारतीय विद्येचा जसजसा जगात प्रसार होत आहे, तशी भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. भारतासंबंधी त्यांच्या मनात नवे आकर्षण निर्माण होत आहे. तसेच भारतासंबंधीचा आदरही वाढला आहे. आज विविध क्षेत्रांमध्ये योगाला महत्त्वाचे स्थान मिळत असून अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांपासून खेळाडूंपर्यंत आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत असंख्यजण शरीरस्वास्थ्यासाठी योगावर विसंबून राहू लागले आहेत. अनेक कंपन्या आणि कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना योगसाधना करता यावी म्हणून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर आणि श्रीनगर येथेही योग लोकप्रिय होत असून यामुळे या प्रदेशाची एक नवी ओळख निर्माण होत आहे, जी या प्रदेशाच्या प्रगतीचे साधन होऊ शकते, अशीही भलावण त्यांनी केली.
जगात योगदिन उत्साहात साजरा
2014 पासून प्रारंभ झालेला आंतरराष्ट्रीय योगदिन शुक्रवारी संपूर्ण जगात उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. जगभरातील अनेक स्थानी सहस्रावधी योगप्रेमींनी निसर्गाच्या सान्निध्यात योगासने आणि प्राणायामाची साधना केली. ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका, इंडोनेशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, ब्राझील, सौदी अरेबिया, स्वीडन, नॉर्वे इत्यादी देशांमध्ये हा दिन साजरा करण्यात आल्याची दृष्ये प्रसारित होत आहेत.
ड दाल सरोवराच्या नजीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली योगसाधना
ड जगभरात योगप्रेमींची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे केले प्रतिपादन
ड योग जगात लोकप्रिय झाल्याने भारतात विदेशी पर्यटकांची संख्यावाढ
ड जगभरात असंख्य स्थानी कोट्यावधी योगप्रेमींनी केली योग प्रात्यक्षिके