तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवातील विजेत्यांना पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी /पणजी
तंबाखू सेवनाच्या हानिकारक दुष्परिणामांचा संदेश पसरविणे तसेच तंबाखूच्या घटना कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित चौथ्या गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवातील विजेत्यांना मंगळवारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ’होय मी करू शकतो’ या जाहिरातपटास एक लाखाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
गोवा मनोरंजन संस्था, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग, गोवा दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ईएसजी मॅकनिज पॅलेसमध्ये या ’जागतिक तंबाखू विरोधी दिवसाचे’ आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर संचालक डॉ. गीता काकोडकर, कर्करोगतज्ञ डॉ. शेखर साळकर, देत महाविद्यालयाच्या डीन डॉ. इडा डी नोरोन्हा, मनोरंजन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचान, दंत महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. अमिता केंकरे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय आणि राज्य अशा दोन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात अनुक्रमे 9 आणि 10 जाहिरातपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. डॉ. केदार रायकर, डॉ. आयव्ही कुतिन्हो आणि चित्रपट समिक्षक सचिन चट्टे या ज्युरी सदस्यांनी परीक्षण केले.
त्यानुसार राष्ट्रीय विभागात रु. एक लाखाचे प्रथम पारितोषिक सतीश गावकर यांच्या ’होय मी करू शकतो’ जाहिरातपटास प्राप्त झाले. ’निरागसतेचा आवाज’ या सुनील नाईक यांच्या जाहिरातपटास 50 हजारांचे द्वितीय पारितोषिक तर केदार मणेरीकर यांच्या ’मुखाग्नी’ जाहिरातपटास 30 हजारांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.
राज्य विभागात सतीश गावकर यांच्या ’होय मी करू शकतो’ या जाहिरातपटास रु. 50 हजारांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. सिद्धी उपाध्ये यांच्या ’कार्बन कॉपी’ जाहिरातपटास 30 हजारांचे द्वितीय पारितोषिक तर रुनल कोळकणकर यांच्या ’इनहेल’ या जाहिरातपटास 20 हजारांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.
डॉ. केंकरे यांनी स्वागतपर भाषणात महोत्सवाचा उद्देश सांगितला. डॉ. साळकर यांनी, तंबाखूचे दुष्परिणाम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सिनेमा हे एक प्रभावी माध्यम असून समाजमनावर त्याचा मोठा प्रभाव पडला असल्याचे सांगितले. तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी कायदा कठोर असावा, असेही मत त्यांनी मांडले.
राज्यातील चित्रपटगृहे, टीव्ही चॅनेल्स, शाळा, महाविद्यालये आणि अन्य सरकारी खात्यांच्या कार्यक्रमांमध्ये तंबाखूविरोधी जाहिरात मोहिमेसाठी या चित्रपटांचा वापर करण्यात येईल, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.









