तेल अवीव :
मध्यपूर्वेत अनेक आघाड्यांवर सुरू असलेल्या युद्धादरम्यान येमेनच्या सैन्याने इस्रायलचे विमानतळ आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ले केले आहेत. परंतु येमेनकडून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. इस्रायलच्या आकाशात शिरण्यापूर्वीच येमेनचे क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इस्रायलच्या कान या शासकीय प्रसारकाने एक व्हिडिओ जारी केला असून यात जेरूसलेमनजीक बेत शेमेश येथे क्षेपणास्त्रांचे अवशेष दिसून येतात. या हल्ल्यानंतर तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळावरील टेकऑफ आणि लँडिंग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी इस्रायलने येमेनची राजधानी सना येथील बंदर आणि ऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले होते.









