येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेच्या शतकोतरी सुवर्ण महोत्सव कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर/येळ्ळूर
सीमा लढ्यात येळ्ळूर गाव नेहमीच अग्रेसर राहिले असून त्यांचे योगदान अतुलनिय आहे. या लढवय्या गावात येताना आनंद झाला. हा इतिहास घडवणारा गाव असून तालुक्यातील इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा. या गावात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या असून स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा या गावाचे योगदान मोठे आहे. हे गाव सैनिकांच्या बरोबर शिक्षकांचेहीगाव आहे. शिक्षणाच्या विचारांना पुढे नेणारे गाव मला खूपच भावले असे विचार, येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ज्येष्ठ नेते ना. शरद पवार यांनी काढले. अध्यक्षस्थानी शतकोतरी कमिटीचे अध्यक्ष रावजी पाटील होते.
ते म्हणाले, सावित्रीबाई व महात्मा ज्योतिराव फुले यांचा आदर्श आम्हाला घ्यावाचं लागेल. समाजाचा रोष पत्करुन त्यांनी मुलींच्या व सार्वत्रिक शिक्षणाचा पाया घातला. येळ्ळूरच्या या शाळेला जात 150 वर्षे पुर्ण झाली. ग्रामीण भागात इतकी वर्षे शैक्षणिक सेवेचा वसा चालवणे एवढे सोपे नाही. त्यामुळे हा शाळेत आपले योगदान दिलेल्या शिक्षकांचे व शिकलेल्या विद्याथ्य्चे त्यांनी आभार मानले. या लढवय्या गावात पुन्हा एकदा येण्याची संधी मिळाली त्याचा आनंद झाला. त्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.
यावेळी व्यासपीठावर माजी कुलगुरु माणिकराव साळुंखे, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, खानापुरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी विधान परिषद महांतेश गवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील, अरविंद पाटील, दिगंबर पाटील, तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, अॅड. एन. डी. पाटील, गौरवाध्यक्ष सतिश पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी, एसडीएमसी अध्यक्षा रुपा धामणेकर, उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर उपस्थित होते.
प्रारंभी पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. प्रभाकर कोरे यांनी, म. जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन प्रा. आनंद मेणसे व महांतेश कवटगीमठ यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी तर उपस्थितांचे स्वागत स्वागताध्यक्ष एन. डी. गोरे यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार स्वागताध्यक्ष सतिश पाटील, रावजी पाटील व एन. डी. गोरे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर शतकोत्तर चित्रफीतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले.
लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, येळ्ळूरवासीयांनी 150 वर्षे पूर्वीची शिक्षण संस्था आजही प्रगतीपथावर ठेवून शाळेचा विकास केल्याबद्दल तुमची जितकी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. राजकारण आले त्यावेळी मी शरद पवार साहेबांचे नाव घ्यायचे व बेळगावचे बारामती करतो, असे आश्वासन द्यायचे. पण मी बारामती बघितलीच नव्हती. पण मी लोकांच्या मनात बरामती निर्माण केली आहे, असे सांगितले.
दुसऱ्या सत्रात डॉ. माणिकराव साळुंखे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन त्याचबरोबर पाचव्या शतकापासून ते आमच्या शिक्षणाच्या प्रवास विराद करुन आपल्या व पाश्चिमात्य देशातील मधील त्रुटी सांगितल्या आज युद्धाने नाही तर ज्ञानाने जागतिक शांती निर्माण होऊन असे ही सांगितले. सुत्रसंचालन सातेरी पाखरे व आभार बबन कानसिडे यांनी मानले.









