हिंडलगा अनुसुचित महिला : ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचे आरक्षण जाहीर : मोर्चेबांधणीला सुरूवात
प्रतिनिधी / बेळगाव
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे आरक्षण गुऊवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा संपली असली तरी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे त्यानुसार येळ्ळूर, उचगाव, सांबरा, काकती ग्राम पंचायतींचे अध्यक्षपद सामान्य महिलासाठी तर हिंडलगा ग्रामपंचायत अनुसुचित महिलासाठी राखीव आहे. अनेकांनी आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच अध्यक्ष, उपाध्यक्षांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायतींचे आरक्षण सर्वसमावेशक असल्याचे दिसून आले.
ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या आरक्षणाची तारीख जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जाहीर केली होती. यावेळी तहसीलदार सिद्राय भोसगी, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यांतील तहसीलदारांवर याबाबतची जबाबदारी टाकण्यात आली होती. बुधवारी बेळगाव तालुक्यातील आरक्षण कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 च्या सुमारास जाहीर करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. एक, दोन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील 57 ग्राम पंचायतमधील आरक्षण जाहीर करण्यात आले. याबाबतची उत्सुकता साऱ्यांना लागली होती. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 500 हून अधिक ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना तहसीलदार व तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 8 वाजल्यापासूनच ग्राम पंचायत सदस्यांनी मोठी गर्दी करण्यास सुरूवात केली होती. साधारण 9.30 वाजण्याच्या सुमारास आरक्षण जाहीर करण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकेच्या आवारात व रंगमंदिर येथे गर्दी दिसून आली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आक्षेपही नोंदविला. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकाचे निरसन केले. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी त्या त्या तालुक्यातील ग्राम पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना याची माहिती देण्यात आली होती. सकाळपासूनच रंगमंदिर येथे येथे गर्दी होत होती.









