समाजकंटकांकडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या भात गंजींना तसेच गवत गंज्यांना आग लावण्याचे प्रकार गुरुवारी रात्री घडला आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
येळ्ळूर येथील केंडी शिवारामध्ये गंगाधर पाटील, उमेश पाटील यांच्या मोठ्या भात गंज्यांना आग लावण्यात आली. यामध्ये दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुनील यशवंत घाडी यांच्या भात गंजींना आग लावण्यात आली. त्यामध्ये त्यांचेही 60 हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. जवळच असलेल्या प्रकाश इंगळे यांच्या गवतगंजीलाही समाजकंटकांनी आग लावली. रात्री उशीरापर्यंत ही आग पेटत होती. अग्निशमन दलाला कळवून पाण्याचा बंब मागविण्यात आला. पेटलेल्या गंज्यांवर फवारणी करण्यात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
मच्छे शिवारामध्ये असलेल्या मारुती कृष्णा चौगुले आणि त्यांचे भाऊ संभाजी चौगुले (रा. मच्छे)यांच्या भात गंजींना आग लावण्यात आली आहे. यामध्ये जवळपास दोन लाखांहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. यल्लाप्पा टक्केकर आणि तानाजी कुट्रे यांच्या भात गंजींनाही आग लावण्यात आली आहे. यामध्ये दोघांचे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे. बाबुराव भूजंग चिठ्ठी यांच्या भात गंजीला आग लावून 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या सर्व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून तहसीलदारांनी आणि तलाठी यांनी सर्व्हे करून संबंधितांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. शेतामध्ये अशाप्रकारे भात गंज्यांना आग लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांनीच लक्ष देणे गरजेचे
गेल्या काही वर्षांपासून शिवारामधील भात गंजींना आग लावण्याचे प्रकार येळ्ळूर तसेच मच्छे शिवारामध्ये वाढले आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी कोणीही अपरिचित व्यक्ती परिसरात घुटमळत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ स्वत:चेच नाही तर इतर शेतकऱ्यांच्या गवतगंज्या तसेच इतर साहित्य पेटविण्याच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.









