येळळूर दि 27 वार्ताहर
येळ्ळूर गावात दुर्गामातेच्या दौडीला सुरुवात झाली असून, गेले चार दिवस गाव शिवरायांच्या जयजयकाराने दुमदुमत आहे. शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या धगधगता इतिहास आणि त्यांचे बलिदान युवकापर्यंत पोहोचावे आणि त्यातून त्याना प्रेरणा मिळावी. या महान पुरुषांचे आदर्श समोर ठेवत युवकांनीही आपल्या जीवनात बदल घडवून समाज घडवण्यात सहभाग घ्यावा असा संदेश प्रशांत मजुकर यानी राजहंसगड येथे झालेल्या दौगीमाता दौडीच्या उद्घाटनादरम्यान सांगितले.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दौडीला प्रारंभ झाला आहे. दौड मार्गावर आकर्षक रांगोळ्या घालून भगवेध्वज व भगव्या लावून वातावरण भगवेमय केले जाते. सुवासिनी दौडीला आरती ओवाळत औक्षण घालत आहेत. यावेळी संपूर्ण भागात भारतीय संस्कृतीचे जीवंत देखावे उभे करून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. बाल शिवाजीच्या रुपातील शिवाजी आणि मावळे ठिकठिकाणी तलवार उंचावत भगव्या ध्वजाला मानवंदना देतानाचे चित्र सर्वाना शिवकाळात नेत आहेत. दौडीत युवकासह युवतींचाही सहभाग मोठा आहे.
प्रत्येक दिवशी दुर्गामातेच्या दौडीला लक्ष्मी चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला वंदन करून दौडीला सुरवात होते आणि ध्येयमंत्राने सांगता होते.









