पुणे / प्रतिनिधी :
विदर्भातील अनेक जिल्हय़ांना पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, दोन दिवसांनंतर या भागातील कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला. यामुळे विदर्भातील उन्हाचा कडाका काही अंशी कमी होणार आहे.
कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात उन्हाचा कडाका वाढला आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्हय़ांनी चाळीशीचा पारा ओलांडला आहे. उष्माघातामुळे अनेक भागांत मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, काही भागात दिवसभर ऊन, रात्री अवकाळीचा तडाखा बसला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, तेलंगणा ते तामिळनाडूदरम्यान वाऱ्याची अखंडितता आहे. यामुळे पुढील तीन दिवस विदर्भातील जिल्हय़ांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस या भागात कमाल तापमान कायम असेल, त्यानंतर मात्र कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे.
अधिक वाचा : संजय राऊत महाविकास आघाडीचे प्रवक्ते; पटोलेंचे टीकास्त्र
बिहार, पश्चिम बंगालात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’
बिहार, पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी अती तीव्र उष्णतेची लाट नोंदविण्यात आली. ओरिसामध्येही उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. या भागात पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, त्यानंतर मात्र ही लाट ओसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज तसेच मध्य प्रदेशातील खजुराहो येथे सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. वायव्य भारतातील कमाल तापमानात 24 तासांनंतर 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.








