तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
पणजी ; राज्यात आजपासून मध्यम तथा काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देऊन हवामान खात्याने तीन दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे. बंगाल आणि ओडिशा दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याचे एक क्षेत्र निर्माण झाले असून त्यातूनच वादळी वाऱ्याची शक्यता वाढली आहे. परिणामी ओडिशा, आंध्र किनारपट्टी तसेच महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक उत्तर व गोव्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. बुधवारी सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र बुधवारी सांखळी व सत्तरीमध्ये दिवसभरात दोनवेळा पाऊस पडून गेला. पणजीसह राज्यातील इतर भागात कडक ऊन होते.
बुधवारी संध्याकाळी जारी केलेल्या माहितीनुसार दि. 12 सप्टेंबरपर्यंत राज्यात सर्वत्र सौम्य तथा मध्यम स्वऊपाचा पाऊस पडणार आहे. आज दि. 7 ते 9 सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांमध्ये बुधवारी हलक्या स्वऊपाचा पाऊस पडला. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरचा पहिला आठवडा कोरडा गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर पाऊस येणार, हा हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. प्रत्यक्षात पाऊस खरोखरच आज पडणार का? असा प्रश्न आहे. दरम्यान राज्यातील सर्व धरणे फुल्ल भरलेली आहेत. मात्र सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाऊस पडला नाही तर यंदाही मार्चपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.









