शहरात अधून-मधून जोरदार सरी
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. शहरासह जिल्ह्यात अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. रविवारी राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून भोगावती नदीपात्रात 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यात तुरळक स्वरुपात पाऊस सुरुच आहे. शनिवारी सायंकाळनंतर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. रविवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी आणि सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी अनुक्रमे 6 व 5 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. शनिवारी घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. तर सार्वजनिक गणेश मंडळांकडून जल्लोषात गणेश आगमन मिरवणुका सुरु आहेत. शहरात शुक्रवारी व शनिवारी पावसाने उसंत दिल्याने गणेशभक्तांसह व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाले यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पुढील तीन दिवस हवामान विभागाने जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. शहरात रविवारी अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने गणेशभक्तांचा काहीसा हिरमोड झाला. पुढील काळात पावसाचा जोर वाढल्यास याचा परिणाम गणेशोत्सवावर होणार आहे.