पुणे / प्रतिनिधी :
राज्याच्या विविध भागांत पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. याबरोबरच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे.
मध्य प्रदेश व लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती आहे. झारखंड ते तामिळनाडूपर्यंत हवेचा ट्रफ आहे. उत्तरेकडील भागात पश्चिमी प्रक्षोभ कायम आहे. या सर्व वातावरणातील घडामोडींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पुढील चार दिवस पावसाचा प्रभाव राहणार आहे. यात शनिवारी महाराष्ट्राच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने झोडपले, तर काही ठिकाणी गाराही पडल्या. रविवार तसेच सोमवारी मराठवाडा तसेच विदर्भाला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर मंगळवारी (18) व बुधवारी (19) संपूर्ण राज्यालाच ‘यलो अलर्ट’ अर्थात वादळी वाऱयासह गडगडाटी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पूर्वेला उष्णतेच्या लाटेचा इशारा
बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र किनारपट्टी, येनेम या भागात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी ओरिसातील बारीपाडा येथे 44 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात रविवारनंतर कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.








