देशाला कास्य पदक मिळवून देण्यात उचलला मोठा वाटा : सर्वत्र कौतुक
येळ्ळूर : टेंट पेगिंग विश्वचषक स्पर्धेत आपली चमक दाखवून देशाला कास्य पदक मिळवून देणाऱ्या येळ्ळूरच्या तरुणाने एक वेगळा इतिहास रचला. दिनेश गंगाराम कर्लेकर असे त्या तरुणाचे नाव असून भारतीय संघामध्ये त्याने केलेली भरीव कामगिरी ही साऱ्यांनाच प्रोत्साहन देणारी आहे. अत्यंत गरीब कुटुंबातून शिक्षण घेवून भारतीय लष्करामध्ये भरती होवून त्याने देशासाठी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पाच सदस्यीय भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टेंट पेगिंग विश्वचषक स्पर्धेमध्ये कास्य पटकाविले. ही ऐतिहासिक कामगिरी केली असून या पाच सदस्यांमध्ये येळ्ळूरच्या जवानाचा समावेश असून येळ्ळूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या त्याच्या यशाबद्दल येळ्ळूर परिसरातून कौतुक होत आहे.
दिनेश गंगाराम कर्लेकर (रा. येळ्ळूर) असे त्या जवानाचे नाव असून तो आसाम रायफलमध्ये भरती झाला होता. त्या ठिकाणी घोडेस्वारीची आवड असल्यामुळे त्याने टेंट पेगिंग या घोडेस्वारीच्या खेळामध्ये भाग घेतला होता. सतत प्रशिक्षण घेवून त्याने भारताच्या संघामध्ये आपली जागा भक्कम केली होती. टेंट पेगिंग हा घोडेस्वारीचा खेळ आहे. त्यामध्ये घोडेस्वाराने भाल्याने जमिनीवरील ठेवलेला लाकडी ठोकळा उचलायचा असतो. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये झाली. त्यामध्ये एकूण 29 देशांचा समावेश होता. त्यामधून भारतच्या या संघाने कास्य पदक पटकाविले आहे. यामध्ये दिनेश कर्लेकरसह मोहीतकुमार, गौतमकुमार अट्टा, अमित छत्री, मोहम्मद अब्रार यांचा समावेश होता. या सर्वांना प्रशिक्षक एस. एस. सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले. येळ्ळूरचा दिनेश कर्लेकर हा 2009 मध्ये आसाम रायफलमध्ये भरती झाला. शिवाजी विद्यालयामध्ये त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर वडगाव येथील आदर्श कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेवून तो भरती झाला होता. लष्करमध्ये दाखल झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार त्याने टेंट पेगिंगमध्ये भाग घेवून त्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याचा भारतीय संघामध्ये समावेश झाला. आता देशाला कास्य पदक मिळवून दिल्याने त्याचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे.









