‘त्या’सहा जणांचे नाव खटल्यातून वगळले : स्वतंत्र खटला दाखल होणार
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ हा फलक हटविण्यात आल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेलाच मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये सुरू आहे. गुरुवारी खटला क्र. 122 ची तारीख होती. मात्र, त्यामध्ये सहा कार्यकर्ते हजर झाले नाहीत. त्यामुळे ती सुनावणी 2 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
या खटल्यामधील सहा कार्यकर्ते वारंवार गैरहजर रहात आहेत. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे या सहा कार्यकर्त्यांना त्या खटल्यातून वगळण्यात आले आहे. सूरज सुरेश नायकोजी, सतीश शिवाजी जाधव, नारायण बाबू कंग्राळकर, अनंत विष्णू पाटील, संजय केदारी गोरल, प्रशांत शिवाजी जाधव अशी खटल्यातून वगळण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर कार्यकर्ते खटल्यामध्ये वारंवार गैरहजर रहात होते. त्यामुळे न्यायाधीशांनी त्यांच्यावर स्वतंत्र खटला दाखल करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार त्या सहा जणांना या खटल्यातून वगळले आहे. आता त्यांच्यावर स्वतंत्र खटला दाखल होणार आहे. या खटल्यामध्ये कार्यकर्त्यांच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. शाम पाटील, ॲड. हेमराज बेंचण्णावर हे काम पहात आहेत.









