कारवार :
पोटच्या मुलीचा खून केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिरसी येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किरण केणी यांनी हा निकाल दिला आहे. हेम्माडी-कुंबरी मजरेचे रहिवासी नागराज नारायण पुजारी याने आपल्या मुलीचा खून केल्याचा गुन्हा साबित झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेप व 17 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारतर्फे अॅड. राजेश एम. मळगीकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. खून झालेल्या मुलीच्या बहिणीला 10 हजार रुपये भरपाई देण्याचेही न्यायालयाने सूचित केले आहे. यल्लापूरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी याप्रकरणी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
नागराज नारायण पुजारी याने मंगला यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना तीन मुली झाल्या. केवळ मुलींनाच जन्म दिल्यामुळे नागराजने पत्नीला मारहाण केली होती. त्यापैकी 11 वर्षांची नयना हिला आठ वर्षांपासून हृदयरोग जडला होता. बेंगळूर येथील जयदेव इस्पितळात उपचार करण्यात आले होते. यासाठी खर्चही बराच आला होता.
नयनाच्या हृदयरोगावर उपचारासाठी आलेल्या खर्चामुळेच आपल्याला गरिबी आली, असे सांगत नागराज आपली मुलगी नयनालाही मारहाण करीत होता. या मारहाणीला कंटाळून 17 जून 2018 रोजी मंगलाने घराबाहेर पडून कारवारमध्ये काम शोधले होते. त्यानंतर नागराज तिला सातत्याने घरी येण्यासाठी दबाव आणत होता. 4 जानेवारी 2019 रोजी नयना व आणखी एक मुलगी सहना यांना कारवार येथील करुणा महिला सांत्वन केंद्रात बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. पत्नी मंगलाने घरी येण्यास नकार दिला.
महिला सांत्वन केंद्रातही नयना व सहना यांना वडिलांबरोबर जाणार का? अशी विचारणा केली. त्यावेळी या दोन्ही मुलींनी काहीच उत्तर दिले नाही. तुम्ही घरी या, तुम्हाला सरळ करतो, असे सांगत नागराजने आपल्या मुलींना 5 जानेवारी रोजी घरी नेले. रात्री 10.30 वाजता नशेत नयना व सहना यांना मारहाण केली. सांत्वन केंद्रामध्ये आपल्यासोबत यायला नकार दिल्याच्या रागातून बापाने मुलीला बेदम मारहाण केली होती. 9 जानेवारी 2019 रोजी हृदयरुग्ण असलेल्या मुलीच्या उपचारासाठी भरपूर खर्च झाला आहे, तिचा खून केला तर आपण आरामात राहता येते, या उद्देशाने बळजबरीने विष पाजून नागराजने नयनाचा खून केला होता. अखेर न्यायालयाने याप्रकरणी नागराजला शिक्षा ठोठावली आहे.









