येडियुराप्पांनी राजकीय विरोधकांचेही केले गुणगाण : दिवसभरात केवळ एकाच प्रश्नावर चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केलेल्या माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना अर्थसंकल्पीय आणि 15 व्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन ठरले. शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केवळ एकाच प्रश्नावर चर्चा झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आपापली मते मांडण्याची संधी आमदारांना दिली. येडियुराप्पा यांनी आगामी निवडणूक लढविणार नाही. सभागृहातील हे आपणे शेवटचे अधिवेशन असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी सभागृहात येडियुराप्पा यांचे गुणगाण करत त्यांना निरोप दिला.
येडियुराप्पांनी शुक्रवारी भाषणाला सुरुवात करतानाच आपले हे शेवटचे अधिवेशन आहे. आपण इतक्या उंचीपर्यंत मजल मारण्यास रा. स्व. संघ कारणीभूत आहे. संघात मिळालेले प्रशिक्षणामुळे आपल्याला उत्तम अनुभव मिळाले. पक्षाने आपल्याला अनेक पदे दिली आहे. 27 फेब्रुवारी रोजी आपल्याला वयाची 80 वर्षे पूर्ण होतील. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: शिमोग्याला येत असल्याने आनंद होत आहे, असे उद्गारही येडियुराप्पा यांनी काढले.
त्यांनी याप्रसंगी विरोधी पक्षातील नेत्यांचेही गुणगाण केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याविषयी सर्वांनाच आदर असायला हवा. या वयातही ते सर्वसामान्यांविषयी विचार करतात. त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखे खूप काही आहे, असेही येडियुराप्पा म्हणाले.
शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी मेहनत घेणार!
पुढील निवडणूक लढविणार नाही. मात्र, राज्यात संचार करून भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आपले उद्दिष्ट आहे. त्याकरिता राज्यभरात प्रचारदौर करणार आहे. तुम्ही पुन्हा एकदा निवडून आले पाहिजे. सत्ताधारी पक्षातील कोणीही विचलित होण्याची आवश्यकता नाही. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी मेहनत घेईन, असेही येडियुराप्पांनी म्हटले.
सिद्धरामय्यांचे गुणगाण
विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी देखील उत्तम काम केले आहे. त्यांच्या कार्याचा कोणत्या पद्धतीने गौरव करावा, हेच उमजत नाही. अनेक मुद्द्यांवर अभ्यास करूनच सभागृहात येऊन ते मार्गदर्शन केल्याप्रमाणे ते बोलतात, हे कोणालाही नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे ए. टी. रामस्वामी यांच्यासारख्या अनेकांनी देखील उत्तम काम केले आहे. पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून येऊन चांगली कामे करा, असे सांगून येडियुराप्पांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
15 व्या विधानसभेचे पाच वर्षात एकूण 167 दिवसांमध्ये 760 तास कामकाज चालले आहे. या कालावधीत एकूण 200 विधेयके मांडण्यात आली. त्याचप्रमाणे 6,754 तारांकीत आणि 27 हजार अतारांकित प्रश्न विचारण्यात आले आहेत.
पंतप्रधानांनी केले येडियुराप्पांच्या भाषणाचे कौतूक
कर्नाटक विधानसभेत माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी केलेल्या निरोपपर भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केले आहे. येडियुराप्पा यांच्या भाषणातून पक्षाची नैतिकता दिसून येते, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे. कर्नाटक भाजपने येडियुराप्पा यांचे भाषण ट्विट केले होते. पंतप्रधान मोदींनी ते रिट्विट केले असून भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला हे भाषण स्फूर्तीदायक वाटले आहे. हे शिवाय हे भाषण इतर पक्षातील कार्यकर्त्यांनाही स्फूर्तीदायक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
बॉक्स…
दोन आमदारांची 100 टक्के हजेरी
15 व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. पाच वर्षात 15 व्या विधानसभेचे एकूण 167 दिवस कामकाज चालले. या कालावधीत दोन आमदारांनी 100 टक्के हजेरी भरली आहे. धारवाड जिल्ह्यातील कलघटगीचे भाजप आमदार सी. एम. निंबण्णावर आणि हासन जिल्ह्यातील बेलूरचे निजद आमदार के. एस. लिंगेश एकही दिवस सभागृहात गैरहजर राहिलेले नाही. विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी ही माहिती सभागृहाला दिली.









