कोल्हापूर :
स्वराज्य रक्षिका, करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय मंगळवारी छत्रपती महाराणी ताराबाई 350 वी जयंती वर्ष समितीच्या नियोजन बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच जागतिक महिलादिन ताराराणी महोत्सव म्हणून साजरा व्हावा, सरकारने ताराराणी यांचे जीवन चरित्र मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये प्रकाशित करावे, साताऱ्यातील ताराराणींचे समाधीस्थळ विकसित करावे, ताराराणींच्या जीवनाची माहिती समजावी यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये ताराराणींच्या जीवनात व्याख्यान आयोजित करावी, यासह 11 ठरावही बैठकीत केले.
नर्सरी बागेतील महाराणी ताराराणींच्या मंदिराजवळच बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार होते. प्रारंभी संयोगिता देसाई, बबिता जाधव व निलम मोरे यांच्या हस्ते ताराराणी यांच्या पुतळ्याचे पुजन केले. यानंतर महाराणी जयंती समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी ताराराणी यांची शौर्यगाथा सांगितली. ताराराणींच्याबाबतीत आपण कोल्हापूरकर अनभिज्ञ राहिलो ही चुक झाली. अशी चुक पुन्हा होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी शालेय पुस्तकात ताराराणींच्या जीवनात धडा समाविष्ठ करावा, असेही मुळीक म्हणाले.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार म्हणाले, जिह्यातील सर्व शाळांमध्ये ताराराणींच्या जीवनात आधारीत वर्षभर कार्यक्रम आयोजित केले जावेत. माजी प्राचार्य डॉ. जे. के. पवार म्हणाले, ताराराणी समाजाला समजाव्यात म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबाच्या चैत्रयात्रेच्या तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवराय व ताराराणी यांचा रथोत्सव सुऊ केला. परंतू सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नव्या पिढीला त्याची जाणिव कऊन देण्यासाठी शाळा–महाविद्यालयात ताराराणी यांच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली जावी. शेतकरी कामगार पक्षाचे शहर सरचिटणीस बाबुराव कदम यांनी वर्षभर आयोजित केलेल्या जाणाऱ्या ताराराणी जयंती कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग असावा, असे सांगितले.
फिरोज खान म्हणाले, समाजातील तऊणी व महिलांना खऱ्या अर्थाने ताराराणींचा इतिहास समजावा यासाठी ताराराणी ब्रिगेडची स्थापना करावी. शैलजा भोसले, प्राचार्य विद्या साळुंखे, माजी प्राचार्य आर. डी. पाटील, एस. व्ही. सूर्यवंशी, आरपीआयचे (गवई गट) भाऊसाहेब काळे, शाहीर दिलीप सावंत, रणजीत पोवार, टी. एस. कांबळे यांनीही सूचना मांडल्या. यावेळी सी. एम. गायकवाड, शंकरराव शेळके, व्ही. के. पाटील, सुजय देसाई, अशोकराव भंडारे, महादेव पाटील व वैभव राजेभोसले उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. सोमनाथ घोडेराव यांनी आभार मानले.
- बैठकीत मांडलेले अन्य ठराव
1)महाराणी ताराराणी यांच्या पराक्रमाचा इतिहास क्रमिक पुस्तकात समाविष्ट व्हावा.
2) शिरोळमधील ताराराणी तख्तपासून रणरागिणी चित्ररथ यात्रा आयोजित करावी.
3) ताराराणींचे छायाचित्र व त्यांचे संघर्षमय चरित्र संक्षिप्त रुपाने प्रकाशित करावे. 4) शिवाजी विद्यापीठांमध्ये ताराराणी विषयावर राष्ट्रीय इतिहास परिषद व्हावी
5) राज्य शासनाने ताराराणींच्या नावाने पुरस्कार सुरू करावा.
- 10 डिसेंबरला अभूतपूर्व कार्यक्रम आयोजित करावा
महाराणी ताराराणी यांचा 1675 साली जन्म झाला हे खरे आहे. परंतू त्यांची जन्मतारिख सापडत नाही. असे असले तरी 10 डिसेंबर हा ताराराणी यांचा स्मृतिदिन असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. या दिवशी अभूतपूर्व असा कार्यक्रम आयोजित करण्याची नवी परंपरा सुऊ व्हावी, असे डॉ. प्रमिला जरग यांनी सांगितले.








