अगदी ठरल्याप्रमाणे झाले. सत्ताधारी भाजप-प्रणित रालोआचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले यात फारसे नवल नव्हते. त्यांना टक्कर देणारा इंडिया आघाडीचा उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रे•ाr यांनी दणकून प्रचार केला खरा पण रालोआचे बहुमत त्यांना तोडता आले नाही. ते शक्यही नव्हते. राज्यकर्त्यांच्या विरोधात कोणी विरोधी पक्षाचा उमेदवार आत्तापर्यंत जिंकला असे कधी घडले नव्हते. जो खुर्चीवर असतो तोच वजीर असतो.
1969 साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक वेगळीच कहाणी घडली होती. तेव्हा सत्ताधारी काँग्रेस पक्षातील दोन गटातच राष्ट्रपतीपदाकरता लढाई झाली आणि सिण्डिकेटच्या विरोधात इंदिरा गांधी यांनी वि. वि. गिरी हा आपला उमेदवार निवडून आणून नीलम संजीव रे•ाr यांचा पराभव केला होता. त्यात विरोधी पक्षांची फारशी कामगिरी नव्हती. खासदारांनी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे असे वादग्रस्त आवाहन करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी निवडणूकच फिरवली होती. आपल्या पक्षातच फूट पाडून मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, अतुल्य घोष प्रभूतींच्या उमेदवाराचे बारा वाजवले होते. या निवडणूकीनंतर काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली आणि इंदिरा काँग्रेस जन्माला आली. सारे कसे अजब घडले होते, घडवले गेलेले होते.
म्हटले तर यावेळच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला एक वेगळी किनार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रभूत्वाखाली असलेला भाजप आणि संघ यांत पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण असावा याबाबत बेबनाव झाल्याची चिन्हे असताना ही निवडणूक झाली. त्यामुळे भाजपचे काही खासदार अचानक टोपी फिरवून विरोधकांना मदत करतील असे युक्तीवाद होत होते. ते फुसका बार ठरणार हेही दिसत होते. कारण भाजपमध्ये दोन तुकडे पडावेत असे प्रत्यक्ष काही घडलेले नव्हते. याचा अर्थ सत्ताधारी पक्षात खदखद नाही असे नाही. पण त्याचा स्फोट होण्याची स्थिती नाही. बंडोबांना थंडोबा राहणे भाग आहे एव्हढी पक्षश्रेष्ठींची जरब आहे.
येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या मागील महिन्यात झालेल्या निवडणूकीत विरोधी पक्षांच्या मदतीने भाजपचे राजीव प्रताप रुडी आपल्याच पक्षाच्या संजीव बाल्यान यांना पराभूत करून निवडून आल्यापासून भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही असा दावा होत होता. पण रुडी यांनी आता जातीने आपण पूर्णपणे भाजपचे निष्ठावंत आहोत असे जाहीर करून पक्षाचे वादग्रस्त सदस्य निशिकांत दुबे यांनी बाल्यान हे गृहमंत्री अमित शहा यांचे उमेदवार आहेत असा अपप्रचार केला असा आरोप केला. ही निवडणूक संपल्यासंपल्या पंतप्रधानांनी संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या उत्तुंग नेतृत्वाचे गोडवे गाणारे लेख लहानथोर बऱ्याच वर्तमानपत्रात जातीने लिहून सर्वप्रथम आपण एक ‘स्वयंसेवक’ च आहोत असा आभास जरूर निर्माण केला. ‘संघ प्रमुखांना गूळ लावण्याचे काम चालू आहे’ अशा प्रकारची विरोधकांकडून संभावना झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन करताना पंतप्रधानांनी संघाच्या शताब्दीचे निमित्त करून त्याची वारेमाप स्तुती केली होती. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये पंतप्रधानांनी नागपूरच्या मुख्यालयाला गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच भेट दिली होती. तात्पर्य काय तर संघाचे गोडवे गात पंतप्रधानांना आपले काम काढून घ्यायचे आहे.
सार्वजनिक कार्यात असलेल्या सर्वानी 75व्या वर्षी जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि नवीन नेतृत्वाला संधी द्यावी असे काही काळापूर्वी भागवत म्हणाले होते. नुकतेच आपण पंतप्रधानांसंबंधित हे विधान केलेले नव्हते तर विनोदाने केलेले होते असे त्यांनी स्पष्टीकरण केले. येत्या आठवड्यात पंतप्रधानांचा 75 वा वाढदिवस आहे. म्हणजे एकीकडे सरसंघचालक अचानक पंतप्रधानांच्या बाजूला उभे राहिल्याचे दिसत आहे. राजकारण हे हितसंबंधांचे असते. त्यात कायम कोणी शत्रू अथवा मित्र नसतो.
जगदीप धनखड यांनी ज्या तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्याने कधी नव्हे एव्हढी भाजपची शोभा झाली होती. धनखड यांना राजीनामा देणे भाग पाडले गेले होते हे आता फारसे गुपित राहिलेले नाही. राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या शपथ समारंभाला अचानक प्रगट होऊन धनखड यांनी सत्ताधाऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचणीत आणण्याचा आपला हेतू नाही हेच जाहीर केले आहे.
राज्यसभेत विरोधकांची मुस्कटदाबी करून राधाकृष्णन हे ‘दुसरे धनखड’ बनणार काय? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. राधाकृष्णन यांचा स्वभाव सर्वांना मिळून मिसळून घेऊन जाणारा आहे असे बोलले जाते. तसे असेल तर ते सरकारला पाहिजे ते काम करतील पण उगीचच धनखड यांच्याप्रमाणे विरोधकांवर दुगाण्या झाडण्याचे बटबटीत काम करणार नाहीत. धनखड यांच्याप्रमाणे राधाकृष्णन हे महत्वाकांक्षी नाहीत. त्यामुळे आपल्या कृत्यांमुळे सरकारला अडचणीत आणण्याचे काम होणार नाही असे मानले जाते. खरे-खोटे कालांतराने कळेल, पण एका प्रख्यात उद्योगपतीला हाताशी धरून धनखड यांनी सरकार उलथवण्याचा आटापिटा चालवला होता, असे आता सांगितले जात आहे.
मोदी-शहा अडचणीत आले असले तरी त्यांची पक्षावरील पकड कमी झालेली नाही. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अचानक दगाफटका होऊ नये म्हणून शहा कामाला लागले होते आणि त्यांनी काही विरोधी पक्षाच्या खासदारांना देखील संपर्क केला होता. किती बरोबर अथवा चूक ते काळच दाखवेल पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी शहा यांच्या गळाला लागले असू शकतात, अशी चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना शहांनी विशेष जबाबदारी दिली होती. काँग्रेसचे मुख्य प्रतोद माणिकम टागोर यांनी भाजपने संसदेमध्येच ‘व्होट चोरी’ करण्याचा आरोप लावून सत्ताधाऱ्यांनी ‘काम’ केले याचीच कबुली दिली आहे.
महाराष्ट्रातील गैर-भाजप पक्ष काहीही म्हणू द्यात पण या निवडणुकीत महाराष्ट्रात छोटे खिंडार जरूर पडले होते. विरोधी आमदार आणि खासदारांची कामे होत नाहीत अशा तक्रारी असताना झालेली ही निवडणूक आहे हे विसरून चालणार नाही. गब्बर असणाऱ्या सत्ताधीशांपुढे विरोधक पाप्याचे पितर आहेत हे पुन्हा एकदा या निवडणुकीत दिसले त्यात नवल ते काहीच नव्हे. राधाकृष्णन यांना जवळजवळ 25 मते जास्त पडली तसेच 15 मते बाद झाली असे सांगितले जाते. रे•ाr यांच्या प्रचाराने सावध झालेल्या भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून आपले बहुमत तर राखलेच पण आपले इलेक्शन मॅनॅजमेण्ट देखील विरोधकांना दाखवून दिले. विरोधकांनी जेव्हढे ऐक्य राखण्याचे प्रयत्न करायचे तेव्हढे केले.
कट्टर भाजपविरोधी असलेल्या नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने कमालच केली. भाजपच्या विरोधी मतदान करण्याच्या ऐवजी त्याला या निवडणुकीत मदतच केली. या निवडणुकीवरच बहिष्कार टाकून बिजू जनता दलाने सत्ताधारी आघाडीचे जिंकण्याचे लक्षच कमी केले. पटनाईक यांचे वादग्रस्त सहाय्यक पांडियन यांच्यामागे ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्सचा ससेमिरा लागू नये, यासाठी असे केल्याचे सांगण्यात येते. पटनाईक यांनी ओडिशामधील सत्ता गेल्यावर पांडियन यांच्याशी संबंध तोडल्याचे जाहीर केलेले होते. पण अजूनही पक्ष पांडियन यांच्या मर्जीतूनच चालत आहे असे दिसत आहे. ऐकावे ते नवलच.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यकर्ते लीलया विजयी झाले. आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वारे कशा रीतीने वाहणार ते दिसणार आहे.
सुनील गाताडे








