अध्याय एकोणतिसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, भक्तांनी अनन्यशरण होऊन माझी भक्ती करावी म्हणजे ते ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी पात्र होतील. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी चित्तशुद्धी होणे महत्वाचे आहे. त्यासाठी नामस्मरण करावे. हे ऐकल्यावर उद्धवाच्या मनात एक शंका उत्पन्न झाली. तिचे निराकरण करावे म्हणून त्याने भगवंतांना विचारले, देवा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी कितीतरी साधने आहेत असे जाणकार सांगतात पण त्या सर्वासाठी तुम्ही तर हे एकच साधन सांगता. असे कसे? त्यावर भगवंत हसून म्हणाले, उद्धवा तू ज्या अन्य साधनांबद्दल बोलतोयस ना ती अभक्तांसाठी आहेत. अभक्त ज्या पुरुषार्थाच्या पूर्ततेसाठी ते प्रयत्न करत असतात ना, ते सहसा साध्य होत नाहीत कारण त्यांच्या वासना सतत वाढतच असतात पण माझ्या भक्तांना माझ्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची काहीच मात्तबरी वाटत नाही. ते फक्त माझे अनन्य भजन करण्यात मग्न असतात. त्यांना माहित असतं की, त्यांच्या योगक्षेमाची काळजी मीच वाहणार आहे. त्यामुळे ते पुरुषार्थ साधण्याच्या मागे लागतच नाहीत. माझ्या भक्तांच्या भाग्याचा हेवा वाटून अनेक देविदेवता त्यांना शरण येतात तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही मुक्ती त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करून त्यांच्या पाया पडत असतात. उद्धवा जे मला अनन्यशरण आलेले असतात ना, त्यांच्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्षही मीच असतो आणखी एक सांगायचं म्हणजे अभक्तांचा पुण्यसाठा संपला की, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. माझ्या भक्तांसाठी मात्र हा नियम लागू नाही बरं का. ते माझी भक्ती कोणत्याही अपेक्षेशिवाय करत असल्याने त्यांच्या खात्यावर नव्याने पाप अथवा पुण्य जमा होत नाही. त्यामुळे पूर्वीच्या पाप पुण्य संचयानुसार त्यांच्या वाट्याला जे भोग आलेले असतात ते भोगले की, त्यांना कायमची मुक्ती मिळते. माझ्या भक्तीची ख्यातीच अशी आहे हे लक्षात घे. देवांनी सांगितलेले भक्तीचे अद्भुत महात्म्य ऐकून उद्धवाला देवांच्या प्रेमाचे भरते आले. ते पाहून भगवंताचे हृदय भरून आले आणि ते अत्यानंदाने उद्धवाला म्हणाले, उद्धवा तुझे चारही पुरुषार्थ आता सिद्ध झाले आहेत. असे म्हणून हृदयाच्या गाभाऱ्यातून त्यांनी उद्धवाला आलिंगन दिले. उद्धवाला अत्यंत प्रेमाने आलिंगन दिल्यामुळे भगवंत आपण कृष्ण आहोत हे विसरले. उद्धवही स्वानंदात निमग्न झाल्याने स्वत:चे अस्तित्व विसरला. त्याला आपण उद्धव आहोत ह्याचा विसर पडला. हे एक अभिनव आलिंगन होते. ह्यामध्ये दोघेही एकमेकात विरघळून गेल्यामुळे, दोघांचेही मी पण संपुष्टात आले. भगवंत परिपूर्ण होतेच. उद्धवही आता त्यांच्या रांकेत जाऊन बसला. दोघांच्याही मनातला हेतू विरून गेला. उद्धवाला आत्मज्ञान करून द्यावे असा हेतू भगवंतांच्या मनात होता तर जोपर्यंत देव आपल्याला उपदेश करत आहेत तोपर्यंत त्यांचे निजधामाला जाणे लांबत जाणार आहे हे ओळखून होतहोइतो त्यांचे निजधामी जाणे लांबवावे असा उद्धवाचा हेतू होता. त्यादृष्टीने तो देवांचे कथन मनापासून ऐकत होता आणि वेळोवेळी निरनिराळ्या शंका उपस्थित करत होता. देवांनी दिलेल्या उत्तराने स्वत:च्या मनाचे समाधान करून घेत होता. भगवंतांनाही निजधामी गेल्यावर होणारा उद्धवाचा विरह सहन होण्यासारखा नसल्याने तेही उद्धवाच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत होतेच त्याशिवाय जर एखाद्यावेळी उद्धव शंका उपस्थित करायचे विसरला तर ते त्यांचा मुद्दा आणखीन स्पष्ट करण्यासाठी आपणहून जास्तीचे स्पष्टीकरण देत होते. अर्थात हा सगळा प्रश्नोत्तरांचा खटाटोप सामान्य भक्तांना ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावे ह्यासाठी चालला होता. अन्यथा उद्धव सज्ञान असल्याने त्याला फारसा उपदेश करण्याची मुळातच गरज नव्हती.
क्रमश:








