नवसाला पावणारी देवी अशी देवीची सर्वदूर ख्याती : खेळणी, मिठाई, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने सजली
बेळगाव : वडगाव येथील मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यात्रेची वडगाव परिसरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. यात्रा असल्यामुळे घरांना रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आकाश पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळण्यांची दुकाने, गृहोपयोगी साहित्य यांनी वडगावचे रस्ते फुलले आहेत. शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा मंगळवारी होणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही यात्रा भरते. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती असल्यामुळे शेकडो भाविक नवस फेडण्यासाठी मंदिर परिसरात दाखल होतात. मागील महिनाभरापासून वडगावमध्ये देवीचे वार पाळण्यात आले. याचबरोबर इतर धार्मिक विधी करण्यात येत असतात.
मंदिरापर्यंत भाविकांना पायपीट
मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असून गाऱ्हाणे उतरविण्यात येते. त्यानंतर यात्रेला सुरुवात होते. केवळ वडगावच नाही तर भाग्यनगर, शहापूर, खासबाग या भागातील नागरिकदेखील ही यात्रा करू लागले आहेत. यात्रा काळात होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी विविध गल्ल्या आणि चौकांमध्ये बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे वडगावला जाणाऱ्या बस येळ्ळूर क्रॉस येथून वळवून पुन्हा माघारी बेळगावला घेण्यात येत आहेत. त्यामुळे येळ्ळूर क्रॉसपासून मंदिरापर्यंत भाविकांना पायपीट करावी लागत आहे. यात्राकाळात नवस फेडले जात असल्याने कोंबडे व बकऱ्यांना मागणी वाढली आहे. वडगाव, शहापूर परिसरात जागोजागी कोंबड्यांची विक्री केली जात आहे. मटण, चिकन विक्रेत्यांनी आपल्या दुकानांसमोर मंडप घालून ग्राहकांना उभे राहण्याची सोय केली आहे. त्याचबरोबर फिरते विक्रेते घरोघरी जाऊन कोंबड्या व पिलांची विक्री करीत आहेत.
मंगाई मंदिर परिसराची महापौरांकडून पाहणी
बेळगाव परिसरातील मोठी यात्रा असल्याने प्रशासनाकडून नियोजनाचा आढावा घेण्यात आला. महापौर शोभा सोमनाचे यांनी सोमवारी सकाळी मंगाईदेवी परिसरात भेट देऊन पाहणी केली. यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी मनपाने घ्यावी, अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी नगरसेविका वाणी जोशी यांच्यासह नगरसेवक व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.









