जय्यत तयारी, मंदिराला फुलांची आकर्षक सजावट : मंदिर परिसर सुशोभित
बेळगाव : नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असणाऱ्या वडगाव येथील श्री मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 22 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. बेळगाव शहरातील ही सर्वात मोठी यात्रा असल्याने वडगावच्या नागरिकांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मानकरी चव्हाण-पाटील घराण्याकडून सर्व धार्मिक विधी करण्यात आले असून मंगळवारी देवीला गाऱ्हाणे उतरवून यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. शेतातील पेरणीची कामे आटोपल्यानंतर मंगाई देवीची यात्रा उत्साहात साजरी होते. वडगाव परिसरातील शेतकरी, कष्टकरी देवीची मनोभावे पूजा करत असल्याने या देवीला शेतकऱ्यांची देवी म्हणूनदेखील ओळखले जाते. यात्रेच्यापूर्वी देवीचे वार पाळले जातात. वारांदिवशी वडगावमधील कुमारिका परिसरातील देवदेवतांना भेटी देऊन पाणी घालत असतात. या काळात मंदिरातील घंटा देखील बांधून ठेवण्यात येते.
यावर्षी मंगळवार दि. 22 रोजी यात्रा होणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने तयारी केली आहे. वडगाव मुख्य रस्त्यापासून अंतर्गत भागात ठिकठिकाणी जाहिरात फलक लागले आहेत. त्याचबरोबर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. आकाश पाळण्यांसह इतर खेळ विष्णू गल्ली कॉर्नर परिसरात दाखल झाले आहेत. पाटील गल्ली, विष्णू गल्ली, वझे गल्ली कॉर्नर, राजवाडा कंपाऊंड येथे गृहोपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. यात्रोत्सवानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी येळ्ळूर क्रॉस येथून बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात येतो. त्यामुळे मंगळवारी परिवहन मंडळाच्या बस येळ्ळूर क्रॉस येथूनच माघारी फिरतात. यात्रोत्सवानिमित्त मध्यवर्ती बसस्थानकातून वडगावपर्यंत अधिक बस सोडल्या जाणार आहेत.
श्री मंगाई देवी यात्रेत प्राणीबळी देऊ नयेत : दयानंद स्वामींचे आवाहन : संदेश यात्राही काढणार
वडगाव येथील प्रसिद्ध श्री मंगाईदेवी यात्रेत प्राणी व पशुबळी देऊ नयेत, अहिंसात्मक पद्धतीने देवीची मनोभावे पूजा करावी, असे आवाहन बेंगळूर येथील विश्व प्राणी कल्याण मंडळ व पशु-प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघ, बसव धर्म ज्ञानपीठाचे दयानंद स्वामीजी यांनी केले आहे. पशु-प्राणी बळी रोखण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला त्यांनी निवेदन दिले आहे. स्वामीजींच्या निवेदनावरूनच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पशु-प्राणी बळीचा आदेश जाहीर केला आहे. देवदेवतांच्या नावे पशुबळी, प्राणीबळी देणे चुकीचे आहे. हे धर्मविरोधी आहे, ही अंधश्रद्धा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्राणीबळी देऊ नयेत. अहिंसात्मक सात्विक पद्धतीने देवीची पूजा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. पवित्र देवालये प्राणीहत्या व अमलीपदार्थांपासून मुक्त व्हावीत. ही देवालये अहिंसा, करुणा, प्रेम, जीवदया, मानवीयता आदी मूल्ये जोपासणारी केंद्रे बनावीत, असेही स्वामीजींनी सांगितले. समाज, मंदिर व्यवस्थापन, सरकार आदींनी या उपक्रमाला पाठिंबा द्यावा. यात्रेच्या काळात अहिंसा प्राणीदया अध्यात्म संदेश यात्रा परिसरात येणार आहे, असेही त्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.









