मुख्यबाजारपेठेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची विविध साहित्य खरेदीसाठी वर्दळ
बेळगाव : यात्रा-जत्रा आणि लग्नसराईला प्रारंभ झाल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. कपडे, सोने आणि नवीन वस्तू खरेदीसाठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे बाजारातदेखील उलाढाल वाढली आहे. एप्रिल-मे महिन्यात लक्ष्मीयात्रा आणि लग्नसराईला जोर येतो. मुख्यबाजारपेठेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून विविध साहित्य खरेदीसाठी वर्दळ वाढू लागली आहे. बाजारात यात्रा-जत्रा आणि लग्नसराईसाठी दुकाने आणि विक्रेते सज्ज झाले आहेत. लग्नकार्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांनी बाजारपेठ फुलू लागली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात अधिक मुहूर्त असल्याने मे महिन्यात खरेदीला उधाण येणार आहे. विविध गावच्या यात्रा-जत्रा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सराफी, कापड आणि इतर दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत बाजारपेठा थंड पडल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम व्यापाऱ्यांसाठीदेखील समाधानकारक ठरणार आहे. लग्नसराईला वेग येऊ लागला आहे. त्यामुळे लग्नपत्रिका, बाशिंग, मंडप, डेकोरेशन आदी वस्तूंसाठी धडपड सुरू होऊ लागली आहे. अलतगा गावच्या महालक्ष्मी यात्रेला येत्या सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे खरेदीला वेग आला आहे. बाजारात कपडे आणि विविध साहित्यांची खरेदी होऊ लागली आहे. यात्रा शाकाहारी व मांसाहारी होणार असल्याने साहित्य खरेदीबरोबरच बकऱ्यांची खरेदीही होऊ लागली आहे. निवडणुकीमुळे गैरसोय बाजारात खरेदीसाठी नागरिक येऊ लागले आहेत. मात्र निवडणुकीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इच्छुक उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शनासाठी समर्थक गर्दी करू लागले आहेत. दरम्यान काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात येत आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.









