वृत्तसंस्था/ कराची
जानेवारी महिन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने यापूर्वीच 17 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी पीसीबीने पाकचा माजी क्रिकेटपटू यासीर अराफतची पाक संघाच्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
पुढील वर्षी अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पाक संघाने सरावाच्या दृष्टीकोनातून ही मालिका आयोजित केली आहे. या वर्षीच्या प्रारंभी यासीर अराफतने पाक संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी पीसीबीकडे अर्ज दाखल केला होता. पाकच्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापूर्वी सायमन हेलमूटकडे सोपविण्यात आली होती. सध्या पाकचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत असून या संघाच्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षकपदाची जबाबदारी हेलमूटकडे सोपविली आहे. यासीर अराफतने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत तीन कसोटी आणि काही वनडे सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले होते. 2009 साली आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या पाक संघामध्ये अराफतचा समावेश होता.









