पंतप्रधानांच्या विशेष सल्लागारपदी नियुक्त
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
काश्मीरचा फुटिरवादी नेता आणि कुख्यात दहशतवादी यासिन मलीकची पत्नी आता पाकिस्तानच्या अंतरिम सरकारमध्ये मंत्री होणार आहे. काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांच्या मंत्रिमंडळात ती मानवाधिकार विषयक विशेष सल्लागार असणार आहे. पाकिस्तानात राहणारी मलिकची पत्नी मुशाल स्वत:चा पती निर्दोष असल्याचे सांगून त्याला वाचविण्याचे पाकिस्तानी नेते तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला वारंवार आवाहन करत आहे. यासिन मलिक सध्या भारतात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मशआल मलिकने 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये यासीन मलिकसोबत विवाह केला होता. मुशाल हे लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पदवीधर आहे. मुशाल मलिकची आई रेहान हुसैन मलिक पीएमएल-एनच्या महिला शाखेच्या महासचिव होत्या. तर वडील एम. ए. हुसैन मलिक हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ होते. यासीन मलिकची पत्नी मुशाल ही इस्लामाबादमध्ये स्वत:ची 12 वर्षीय मुलगी रजिया सुल्तानसोबत राहते. पाकिस्तान स्वत:च्या दुष्प्रचाराच्या मोहिमेसाठी यासीन मलिकची मुलगी रजिता सुल्तानचा वापर करू पाहत आहे. रजिया सुल्तान दहशतवादी कृत्यांप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या स्वत:च्या वडिलांच्या मुक्ततेचे आवाहन करत आहे. रजियाने अलिकडेच पाकव्याप्त काश्मीरच्या सभागृहाला संबोधित केले आहे. मागील वर्षी 24 मे रोजी एनआयए न्यायालयाने यासिन मलिकला दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याचबरोबर अन्य काही गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासिन याचबरोबर 1990 मध्ये वायुदलाच्या चार सैनिकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या रुबिया सईदचे अपहरण त्याने केले होते.









