10 गुन्हय़ांमध्ये 10 वर्षांचा कारावास ः 10 लाखांचा दंडही ः सर्व शिक्षा एकाचवेळी चालतील
@ नवी दिल्ली, श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासीन मलिकला टेरर फंडिंगप्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात एनआयए न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. यासीनला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची आणि 10 प्रकरणांमध्ये 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय 10 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. या सर्व शिक्षा त्याला एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत. अंतिम सुनावणीवेळी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने दुहेरी जन्मठेप ठोठावल्यामुळे आता त्याला कारागृहातच रहावे लागणार आहे.
यासीनवर पाकिस्तानच्या पाठिंब्याने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी आणि शस्त्रे पुरवण्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. या गुन्हय़ांप्रकरणी मलिक 2019 पासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे. न्यायालयीन सुनावणीमध्ये युएपीए कलम 16 (दहशतवादी कारवाया), 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्यांचा कट) आणि 20 (दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य) आदी प्रकरणांमध्ये आपला सहभाग यासीनने मान्य केला आहे. तसेच आयपीसीच्या कलम 120-बी (गुन्हेगारी कट) आणि 124-ए (देशद्रोह) अंतर्गत आपल्यावरील आरोपांना आव्हान देणार नसल्याचे स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि अन्य बेकायदेशीर कारवायांसाठी जगभरातून पैसे जमविल्याची कबुली मलिकने दिली होती. न्यायालयाने फारुक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, अब्दुल राशिद शेख यांच्यासह अन्य काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांच्या विरोधात आरोप निश्चित केले होते. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीनच्या विरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपींना याप्रकरणी फरार घोषित करण्यात आले आहे.
यासीन मलिक हा फुटिरतावादी नेता असून जम्मू-काश्मीर लिबरेशन प्रंटशी संबंधित आहे. काश्मीर खोऱयातील तरुणांची माथी भडकवून त्यांना शस्त्र हाती घेण्यास चिथावण्याचा आरोप त्याच्यावर आहे. मलिकवर 25 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरमध्ये वायुदलाच्या सैनिकावर हल्ला करण्याचा आरोप आहे. या हल्ल्यात 40 जण जखमी झाले होते. तर 4 सैनिक हुतात्मा झाले होते.
शिक्षा सुनावणीवेळी कडेकोट बंदोबस्त
शिक्षा सुनावण्यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाची सुरक्षा कडक करण्यात आली होती. दुसरीकडे श्रीनगरमध्ये अनेक बाजारपेठा बंद होत्या. तेथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बुधवारी काही भागात दगडफेकीच्या घटनाही घडल्या. हिंसाचार फैलावण्याच्या भीतीने श्रीनगर आणि आजूबाजूच्या परिसरात मोबाईल आणि इंटरनेट सेवा तात्काळ बंद करण्यात आली होती. शिक्षेचा निकाल येण्यापूर्वी यासीन मलिकच्या घराबाहेरील लोकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. याप्रसंगी गोंधळ वाढल्यामुळे सुरक्षा दलांनी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.
‘शिक्षा मंजूर, माफी मागणार नाही’
गेल्या 28 वर्षांतील कोणत्याही दहशतवादी कारवाया किंवा हिंसाचारात सहभागी झाल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन. मी फाशीची शिक्षाही मान्य करेन, मी माफी मागणार नाही. मी सात पंतप्रधानांसोबत काम केले आहे, असे यासीन मलिक याने शिक्षा सुनावण्यापूर्वी स्पष्ट केले होते. चालू महिन्याच्या प्रारंभी मलिकने स्वतःवरील सर्व आरोप मान्य केले होते. यात युएपीए अंतर्गत नोंद गुन्हय़ाचीही कबुली होती. दहशतवादी कारवायांमध्ये सामील असणे, गुन्हेगारी कट रचण्याचाही गुन्हा यात होता.









