केंद्र सरकारकडून प्रस्तावाला मान्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा आता अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. अधिकृत निवासस्थानातून रोख रकमेच्या जप्तीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांची मूळ अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्रालयाने शुक्रवारी त्यांच्या बदलीची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली. यासोबतच दिल्ली उच्च न्यायालयाचे आणखी एक न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांचीही अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
रोख रकमेच्या जप्तीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी 22 मार्च रोजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध तीन सदस्यांची अंतर्गत चौकशी सुरू केली होती. 14 मार्च रोजी आग लागलेल्या न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासी संकुलातून चलनी नोटांचे गठ्ठे सापडल्याचा आरोप आहे. आग विझवणाऱ्या अग्निशमन दलाच्या पथकाने स्टोअर रूममध्ये नोटांचे हे गठ्ठे पाहिले होते. आगीमुळे अनेक नोटा जळाल्याचे निदर्शनास आल्यापासून न्यायमूर्ती यशवंत वर्मा आरोपांच्या गर्तेत अडकले आहेत. या प्रकारानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.









