वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल 20 खेळाडूंमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविऊद्ध चालू असलेल्या मालिकेत पाठोपाठ द्विशतके झळकावून त्याने फलंदाजी क्रमवारीत 14 स्थानांची वाढ साध्य केली आहे आणि तो 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.
हा 22 वर्षीय डावखुरा खेळाडू विनोद कांबळी आणि विराट कोहली या दोन भारतीयांसह सलग दोन कसोटींमध्ये द्विशतके झळकावणाऱ्या सात क्रिकेटपटूंच्या गटात सामील झाला आहे. जैस्वालने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात 209 धावा केल्या आणि त्यानंतर राजकोट येथे तिसऱ्या कसोटीत नाबाद 214 धावा फटकावून इंग्लंडवर 434 धावांनी विजय तसेच मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
राजकोटमध्ये सामनावीर ठरलेला रवींद्र जडेजाही पहिल्या डावातील 112 धावांच्या खेळीनंतर फलंदाजी क्रमवारीत 41 व्या स्थानावरून 34 व्या स्थानावर पोहोचला असल्याचे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. सदर सामन्यात सात बळी घेतल्यामुळे जडेजा गोलंदाजी क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, ज्याने राजकोट येथील कसोटीत 500 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रवेश केला, तो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या मागे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
जडेजा आणि अश्विन यांनी कसोटीतील अष्टपैलूंच्या क्रमवारीतील पहिली दोन स्थाने कायम राखली आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माने राजकोट येथे पहिल्या डावात 131 धावा केल्यानंतर फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने बढत मिळून् तो 12 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर शुभमन गिल दुसऱ्या डावात शतकाच्या जवळ आल्यानंतर तीन स्थानांनी प्रगती करत 35 व्या स्थानावर पोहोचला आहे. नवोदित सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनीही क्रमवारीत अनुक्रमे 75 व्या आणि 100 व्या स्थानावर प्रवेश केला आहे.









