प्रतिनिधी/ बेळगाव
मुद्रण कलेमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या उद्यमबाग येथील यारबल प्रिंट पॅक यांना ‘प्रिंट वीक-2023’तर्फे एसएमई कंपनी ऑफ द ईयर हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यारबलचे कार्यकारी संचालक अमेय पाटील व चेअरमन अजित गणपतराव पाटील यांनी हा पुरस्कार पिडीलाईट इंडस्ट्रीजचे प्रमुख अशोक नारायण यांच्या हस्ते मुंबई येथे स्वीकारला.
प्रिंटिंग क्षेत्रातील अनेक पुरस्कार यारबलने मिळविले आहेत. यारबल प्रिंट पॅकचा उत्कृष्ट दर्जा, अल्पावधीत केलेली प्रगती, व्यवसायाचा वाढविलेला विस्तार, कर्मचाऱ्यांवर केला जाणारा खर्च व व्यवस्थापन कौशल्य अशा सर्व निकषांवर त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. देशात अशा प्रकारची 1200 युनिट्स स्पर्धेत असताना कमीत कमी रिसोर्समध्ये अधिकाधिक आऊटपूट दिल्याबद्दल यारबल या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
यापूर्वीही यारबलला 2005 मध्ये दोन राष्ट्रीय, 2008 मध्ये एक राष्ट्रीय, 2012 मध्ये राज्य सरकारतर्फे कासिया पुरस्कार व 2020 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.









