सिग्नलचा मुद्दा ‘तरुण भारत’ने सातत्याने लावून धरला : त्रस्त पादचाऱ्यांची कोंडीतून सुटका
बेळगाव : दीर्घ प्रतीक्षा व सततच्या मागणीनंतर यंदे खूट सिग्नल अखेर सुरू झाला आहे. या सिग्नलचा मुद्दा ‘तरुण भारत’ने सातत्याने लावून धरला होता. सोमवार दि. 3 रोजीच्या अंकामध्ये शहरातील एकूणच वाहतूक अव्यवस्थेबद्दल ‘कोंडी वाहतुकीची दमछाक बेळगावकरांची’ हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये ‘शहरातील सिग्नल यंत्रणा कोलमडली’ ही चौकटही प्रसिद्ध झाली होती. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ येथील सिग्नल बंद होता. परिणामी वाहतूक नियंत्रित करणे कठीण होत होते. तेथे वाहतूक पोलीस नसायचे तेव्हा वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहन पुढे दामटायचे. त्यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि पादचारी यांना चालत जाणे किंवा अलीकडून-पलीकडे जाणे यासाठी कसरत करावी लागायची. अखेर मंगळवारी ही सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाली. आता ती पुन्हा खंड न पडता सातत्याने कार्यान्वित रहावी, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. या परिसरात अनेक शाळा असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे पालकवर्ग त्रस्त होते. आता सिग्नल कार्यान्वित झाल्याने पालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.









