साडेसात हजाराहून अधिक जणांची फसवणूक
बेळगाव : कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील एका आरोपीला अटक करून त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली असून तब्बल 7,700 हून अधिक जणांच्या फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. यमनापूर (ता. बेळगाव) येथील एकाच कुटुंबातील चौघा जणांविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. 19 कोटी 35 लाख 35 हजार 636 रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी होळ्याप्पा फकिराप्पा दड्डी (वय 40) याला अटक केली आहे. होळ्याप्पाची पत्नी अश्विनी, मुली शेवंता व प्रियांका या चौघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महर्षी वाल्मिकी महिला स्व-साहाय्य संघाच्या नावे वेगवेगळ्या फायनान्समधून कर्ज मिळवून देण्याचे सांगून या चौकडीने 7 हजार 707 जणांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे. कर्जानंतर सबसिडी मिळवून देऊ, त्याचे हफ्तेही आपणच भरू, असे सांगत फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी होळ्याप्पाला अटक केली असून पोलीस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.









