नोकरी देण्याची निवेदनाद्वारे मागणी : गाव दत्तक घेऊनही सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष, ग्रामस्थांमध्ये संताप
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडाल्कोसाठी यमनापूर येथील 800 हून अधिक एकर जमीन घेण्यात आली. जमीन घेताना जमीनधारकांच्या कुटुंबीयांतील एका व्यक्तीला नोकरी देतो, असे सांगण्यात आले होते. मात्र नोकरी देण्यात आली नाही. याचबरोबर यमनापूर गाव दत्तक घेतले असून सर्व सुविधा पुरवितो, असे ठोस आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या सर्व समस्यांबाबत यमनापूर ग्रामस्थांनी हिंडाल्कोवर मोर्चा काढून तेथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
यमनापूर गाव हे प़ृषीप्रधान गाव म्हणून ओळखले जात होते. गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जनावरे पाळली आहेत. त्या जनावरांना चरण्यासाठी हिंडाल्को परिसरात पूर्वी मुभा देण्यात आली होती.
मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. यमनापूर गावचा संपूर्ण विकास करण्याचे आश्वासन दिले होते. रस्ते करणे याचबरोबर पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता पाणीदेखील या गावाला दिले जात नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
आमच्या जमिनी घेताना कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देतो, असे सांगितले होते. त्यावेळी आमची मुले शिकली नव्हती. आता मुलांनी शिक्षण घेतले आहे. मात्र नोकरी देण्यास तयार नाहीत. पूर्वी जमीन गेलेल्या शेतकरी कुटुंबांना कामेदेखील दिली जात होती. मात्र आता कामही नाही. त्यामुळे बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. तेंव्हा आम्हाला किमान कंत्राटी पद्धतीने तरी नोकरी द्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
यमनापूर येथून हिंडाल्कोपर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानतंर हिंडाल्कोच्या व्यवस्थापकांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी परशराम पाटील, खाचु पाटील, रमेश पाटील, भाऊराव कोनेवाडी, सिद्राय पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









