सावळज,वार्ताहर
Sangli News: तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे (वय-२३) या भारतीय सैन्यदलातील जवानाने कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी रात्री अचानक आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.उद्या (रविवार) सकाळी त्याच्यांवर अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.दोन वर्षांपूर्वीच सैनदलात भरती झालेल्या जवानाच्या आत्महत्यामुळे तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर डोंबाळे हा रत्नागिरीमध्ये झालेल्या भरतीत भारतीय सैन्यदलात रुजू झाला होता. त्याचे पुण्यामध्ये ट्रेनिंग झाले.सध्या तो जम्मू काश्मीरमधील सांबा या जिल्ह्यात कार्यरत होता.घरची परिस्थिती बेताची असताना मयूर याने सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला होता.त्याच्या पश्चात घरी आई -वडील,एक मोठा भाऊ व एक बहीण आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री मयूर याने अचानक आत्महत्या केली.मात्र त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली,हे अद्याप स्पष्ट झाले नाही.सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत मयूर याच्या कुटुंबियांना माहिती दिली.शुक्रवारी सकाळी त्याचे कुटुंबीय जम्मू काश्मीरला गेले आहे.उत्तरीय तपासणीनंतर मयूरचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.असे कुटुंबीयांनी सांगितले.
आज (शनिवार) रात्री उशिरापर्यंत मयूरचे कुटुंबीय पुण्यात पोहोचतील.तर उद्या (रविवार) सकाळी ते मूळ गावी यमगरवाडी येथे पोहोचतील.त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.मात्र शुक्रवारी या जवानांच्या कुटुंबियांना ही बातमी समजल्यावर गावावर शोककळा पसरली आहे.