सुरक्षा दलांकडून अवंतिपोरामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा ः चकमकीत एक जवान हुतात्मा
वृत्तसंस्था / श्रीनगर
काश्मीरच्या अवंतिपोरा येथील पडगामपोरा भागात सैन्य आणि दहशतवाद्यांदरम्यान सोमवारी रात्रीपासून चकमक सुरू आहे. मंगळवारी दुपारपर्यंत सैन्याने या चकमकीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे. यातील एका मृत दहशतवाद्याची ओळख पटली असून तो पुलवामाचा रहिवासी अकीब मुश्ताक भट असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकीबने रविवारी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या केली होती.
अकीब हा ए कॅटेगरीत सामील दहशतवादी होता. अकीबने हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी प्रारंभी कारवाया केल्या होत्या. परंतु सध्या तो टीआरएफ या दहशतवादी संघटनेत सक्रीय होता.
अवंतिपोरा येथे सैन्याने घेरल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्यावर काही वेळातच एक दहशतवादी मारला गेला. दहशतवाद्याच्या मृतदेहाकडून काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज सुरक्षा दलांनी हस्तगत केले आहेत.
या चकमकीदरम्यान दोन सैनिक जखमी झाले होते. या सैनिकांवर 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यातील एका सैनिकाला हौतात्म्य प्राप्त झाले आहे. तर अवंतिपोरा येथे आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने शोधमोहीम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सैन्याने संबंधित परिसरात दहशतवाद्यांचा शोध चालविला आहे.
तत्पूर्वी दहशतवाद्यंनी पुलवामामध्ये रविवारी एटीएम सुरक्षा कर्मचारी संजय शर्मा यांची हत्या केली होती. टार्गेट किलिंगमध्ये मारले गेलेले काश्मिरी पंडित शर्मा यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या अंत्यसंस्कारावेळी पोलीस अधिकाऱयांसमवेत अनेक नेते तसेच स्थानिक लोक उपस्थित होते. तर शर्मा यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी स्वतःच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त करत निदर्शने केली आहेत.









