प्रतिनिधी / बेळगाव : येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उलट येळ्ळूरच्या जनतेवर गुन्हे दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी येथील जे एम एफ सी न्यायालयात सुरु आहे. त्याठिकाणी एका खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला असून बुधवारी फिर्यादीने आपली साक्ष दिली आहे. १०० ते २०० जण होते मात्र त्यामधील हेच आहेत कि नाही हे मला माहीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येळ्ळूरच्या त्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
न्यायालयामध्ये आता सुनावणीला प्रारंभ झाल्याने या खटल्याचा निकाल देखील लवकर लागण्याची शक्यता आहे. खटला क्र. ७९४/१५ च्या खटल्यात ही सुनावणी झाली आहे. या खटल्यात कुमार परशराम मासेकर, मनोज लक्ष्मण नायकोजी, केदारी पाटील, नंदू कुगजी, राहुल अष्टेकर, नामदेव कदम राजू नायकोजी, सुधीर धामणेकर, जयसिंग अष्टेकर, प्रकाश कुगजी यांचा समावेश आहे. या सर्वांच्या वतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावार हे काम पाहत आहेत.









