बेळगाव : बेळगाव जिल्हा सायकलिंग संघटना व केएमएफ यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत महिला गटात बेळगावच्या अमूल्या पुजेरी व पुरुष गटात रामदुर्गच्या यल्लेश कुडेद यांनी विजेतेपद पटकाविले. सीपीएड मैदानावर दुपारी बेळगाव जिल्हा सायकलिंग संघटना व केएमएफतर्फे आयोजित सायकलिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री व कर्नाटक केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी, माजी एमएलसी व बेळगाव केएमएफचे अध्यक्ष विवेकराव पाटील, उद्योजक अनिल पोतदार, सायकलिंग प्रशिक्षक मोहन पत्तार, एम. पी. मरनुर, आर. एच. पुजारी, बाळ सुळेभावी, राज के. पुडे, व्हळाप्पा दंडी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत पुरुष विभागात 40 तर महिला विभागात 35 सायकलपटूंनी सहभाग घेतला होता.
पुरुष गटात 8 किमी सायकलिंग स्पर्धेत यल्लेश एच. हुडेद रामदुर्ग याने पहिला, हनुमंत बीके मुडलगी याने दुसरा, हनुमंताप्पा धर्मट्टी रामदुर्ग याने तिसरा, दर्शन एन. देसाई याने चौथा, मुत्तण्ण पाटील अथणी याने पाचवा तर आदित्य गुरव बेळगाव याने सहावा क्रमांक पटकाविला. महिला गटात अमुल्या एल. पुजेरी बैळगाव हिने पहिला, प्रिती बी. हलबार बेळगाव हिने दुसरा, सानिका एल. पाटील बेळगाव हिने तिसरा, मेघा बी. गांधी हीने चौथा, राजश्री एच. दलवाई रायबाग हिने पाचवा, सुधा एस. बोरगावी हिने सहावा क्रमांक पटकाविला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे केएमएफच्या डायरेक्टरांच्या हस्ते विजेत्या पुरुष व महिला गटातील सर्व स्पर्धकांना चषक, पदके, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सायकलिंग प्रशिक्षक मोहन पत्तार, एम. पी. मरनुर, आर. एच. पुजारी, बाळ सुळेभावी, राज के. पुडे, व्हळाप्पा दंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.








