शाकंभरी पौर्णिमेनिमित्त अतिरिक्त बससेवा
बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेतून परिवहनला 15 लाख 85 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दि. 3 ते 19 जानेवारी दरम्यान परिवहनने सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. यात्राकाळात दररोज 50 हून अधिक बसेस बेळगाव-सौंदत्ती मार्गावर धावल्या. यातून परिवहनला महसूल मिळाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळावी यासाठी बेळगाव-सौंदत्ती मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांचाही प्रतिसाद मिळाला होता. फुल्ल 170 रु. तर हाफ 90 रुपये तिकीट दर होता. लाखो भाविकांनी सौंदत्ती डेंगरावर गर्दी केली होती. बेळगावसह खानापूर आणि चंदगड तालुक्यातीलही भाविक दाखल झाले होते. त्यामुळे परिवहनला अतिरिक्त बसेसची व्यवस्था करावी लागली होती.
मध्यवर्ती बसस्थानकातून सौंदत्ती अशी बससेवा सुरू करण्यात आली होती. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. यासाठी यात्राकाळात जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या शाकंभरी पौर्णिमेतून 26 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. मात्र त्या तुलनेत यंदाच्या पौर्णिमेतून उत्पन्न कमी झाले आहे. यात्राजत्रा काळात विविध मार्गावर जादा बसेस सोडल्या जात आहेत. या बससेवेतून परिवहनलाही समाधानकारक उत्पन्न मिळते. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने इतर मार्गावर प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. आधीच शक्ती योजनेमुळे बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत यात्राजत्रांसाठी बससेवा उपलब्ध करून देताना परिवहनची डोकेदुखी वाढू लागली आहे.









