वृत्तसंस्था/ जयपूर
सध्या सुरु असलेल्या 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत भारताचा तसेच राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने रविवारी हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात दर्जेदार कामगिरी केली होती. आता या स्पर्धेच्या इतिहासामध्ये चहल गोलंदाजांच्या यादीमध्ये संयुक्त आघाडी मिळविण्याचा पराक्रम केला आहे.
चहलने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आपल्या 4 षटकात 29 धावात 4 गडी बाद केले होते. या सामन्यामध्ये त्यांने अनमोलप्रित सिंग, क्लासन, अभिषेक शर्मा आणि कर्णधार मार्करम यांना बाद केले होते. यजुवेंद्र चहलने आयपीएलच्या इतिहासामध्ये आतापर्यंत 142 डावात 183 बळी 21.60 धावांच्या सरासरीने घेतले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज् विरुद्धच्या सामन्यात त्याने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 40 धावात 5 बळी मिळविले होते. आयपीएलमध्ये या पूर्वी चेन्नई सुपर किंग्ज् संघातील माजी वेगवान गोलंदाज विंडीजचा ड्वेन ब्रॅव्होने 161 सामन्यात 183 गडी बाद केले होते. यजुवेंद्र चहलने ब्रॅव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता पीयुष चावला 174 बळींसह दुसऱ्या, अमित मिश्रा 172 बळींसह तिसऱ्या तर रवीचंद्रन अश्विन 171 बळींसह चौथ्या स्थानावर आहे.









