बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेच्या प्रसंगी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या पेट्रॉनपदी बेळगाव पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची नियुक्ती करण्यात आली. गणाधीश लॉन येथे आयोजित केलेल्या चषकाच्या अनावरण प्रसंगी नूतन पेट्रॉन आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पेट्रॉनपदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, गजानन धामणेकर, अजित गरगट्टी, विठ्ठल प्रभू, सुबोध गावडे, लेस्टर डिसोजा, गोपाळ खांडे, अमित पाटील आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी यडा मार्टिन मार्बन्यांग आपण गुलबर्गा जिल्हा पोलीस प्रमुख असताना जिल्ह्यात फुटबॉलचे मैदान उपलब्ध करुन दिले आहे.
बेळगावात बदली झाल्यावर राष्ट्रीय व राज्य स्पर्धेसाठी मला निमंत्रीत करण्यात आले होते. यावेळी आपण बेळगावच्या खेळाडूंचा खेळ पाहून प्रभावी झालो आहे. बेळगावच्या फुटबॉलच्यापटूंकडून टॅलेंट असल्याने येथील खेळाडू चमकतील. असा विश्वास आहे. खेळाची आवड असल्याने संघटनेने पेट्रॉनपदाची सुत्रे आपण स्वीकारावी, अशी विनंती केली. त्याला मी मान देवून या पदाची सुत्रे मी स्वीकारली. यापुढे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेला स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. बेळगावच्या खेळाडूंनी जात, धर्म, भाषा याचा द्वेष न करता खेळाडूवृत्तीने खेळ करावा. खेळात कोणतेही राजकारण अथवा गुन्हेगारी सारखे प्रकार आणू नये तसे केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत देवदानम, अल्लाबक्ष बेपारी, एस. एस. नरगोडी, उमेश मजुकर, जॉर्ज रॉड्रीग्ज, अरिहंत बल्लाळ,मयुर कदम, दिनेश पत्की आदी उपस्थित होते.









