समुहाच्या परिषदेत सामील होणार चीनचे अध्यक्ष
वृत्तसंस्था/ बीजिंग
ब्रिक्स परिषद 22-24 ऑगस्ट या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे आयोजित होणार आहे. 15 व्या ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षत्व दक्षिण आफ्रिकेकडे आहे. या परिषदेत सामील होण्यासाठी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती चीनच्या विदेश मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
21-24 ऑगस्ट या कालावधीतील दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यादरम्यान क्षी जिनपिंग हे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्यासोबत चीन-आफ्रिकन नेत्यांच्या चर्चासत्राचे सह-अध्यक्षत्व सांभाळणार आहेत. चीन ब्रिक्स संघटनेचा मुख्य सदस्य देश असून यात ब्राझील, रशिया, भारताचाही समावेश आहे.
पुतीन व्हर्च्युअली सामील होणार
ब्रिक्स ही संघटना जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने ते शिखर परिषदेत प्रत्यक्ष स्वरुपात सहभागी होणार नाहीत. पुतीन हे व्हर्च्युअली माध्यमातून शिखर परिषदेत भाग घेणार आहेत.
अनेक देश इच्छुक
ब्रिक्स संघटनेत आणखी काही देशांना सामील करण्यास आमचे समर्थन आहे. याविषयीचा मुद्दा शिखर परिषदेत उपस्थित करण्याचा विचर असल्याचे ब्राझीलचे अध्यक्ष लुइज इनासियो लूला डा सिल्वा यांनी म्हटले आहे. सुमारे 20 देशांनी औपचारिक स्वरुपात ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला आहे. अर्जेंटीना, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इराण आणि व्हेनेझुएला यांचा यात समावेश असल्याची माहिती ब्राझीलच्या विदेशमंत्री माउरो विएरा यांनी दिली आहे.









