जी-20 परिषदेत चीनचे पंतप्रधान होणार सामील : बिडेन यांनी व्यक्त केली निराशा
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे जी-20 परिषदेत भाग घेण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार नाहीत. त्यांच्या जागी चीनचे पंतप्रधान ली कियांग हे जी-20 शिखर परिषदेत सामील होणार आहेत. जिनपिंग हे परिषदेत सामील होणार नसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी निराशा व्यक्त केली आहे. जी-20 परिषद 9-10 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत पार पडणार आहे. ली कियांग हे जी-20 परिषदेत चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सोमवारी दिली आहे.
जिनपिंग भारतात येणार नसल्याचे कळल्यावर मी अत्यंत निराश झालो. परंतु मी त्यांना निश्चितपणे भेटणार असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे. जिनपिंग यांना कधी आणि कुठे भेटणार हे बिडेन यांनी स्पष्ट केले नाही. क्षी जिनपिंग यांच्यासोबत बिडेन यांची चर्चा व्हावी म्हणून अमेरिका मागील काही काळापासून प्रयत्नशील आहे. चीनसोबतच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्याची इच्छा बिडेन यांनी अनेकदा व्यक्त केली आहे.
अंतर्गत विषयांमध्ये गुंतले
चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचे देशांतर्गत स्थितीवर अधिक लक्ष केंद्रीत आहे. चीनच्या आर्थिक विकासाचा वेग जलदपणे कमी होत आहे. अशा स्थितीत जिनपिंग हे चालू वर्षात केवळ 5 दिवस चीनबाहेर राहिले आहेत. जिनपिंग हे 6 सप्टेंबरपासून इंडोनेशियात आयोजित होणाऱ्या आसियान परिषदेतही भाग घेणार नाहीत. जी-20 आणि आसियानमध्ये त्यांच्या जागी पंतप्रधान ली कियांक सामील होणार आहेत.
सौदी युवराजांबद्दल साशंकता
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान देखील जी-20 परिषदेत सामील होणार नसल्याची चर्चा आहे. परिषदेपूर्वी सलमान हे पाकिस्तानचा दौरा करणार होते. परंतु त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्या भारत दौऱ्याबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे.