इलॉन मस्क यांची घोषणा : ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर अनेक नवी फीचर्स मिळणार
वृत्तसंस्था/ वॉशिग्टन
टेस्लाचे प्रमुख आणि अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या एक्स प्लॅटफॉर्मने ‘एक्सचॅट’ नावाचे एक नवीन मेसेजिंग फीचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने ‘एक्स’ धारकांना एंड-टू-एंड एक्रिप्शन, ऑटो डिलीट मेसेज आणि कोणत्याही प्रकारच्या फाईल्स पाठवण्याचा पर्याय मिळेल. हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे.
इलॉन मस्क यांनी रविवारी पोस्ट करून ‘एक्सचॅट’ या फीचरबद्दल माहिती दिली आहे. नवीन ‘एक्सचॅट’ रोलआउट केले जात असून ते एक्रिप्शन, व्हॅनिशिंग मेसेजेस आणि फाईल्स पाठवण्याचा पर्याय देते, असे मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच अन्य एका पोस्टमध्ये ‘एक्सचॅट’च्या मदतीने वापरकर्ते ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलदेखील करू शकतील. यासाठी मोबाईल नंबर लिंक करण्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या चाचणी प्रक्रिया सुरू
‘एक्सचॅट’मध्ये बिटकॉइन-शैलीतील एक्रिप्शन वापरले गेले असून ते पूर्णपणे नवीन संरचनेनुसार तयार केल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. ‘टेकक्रंच’च्या रिपोर्टनुसार, ‘एक्सचॅट’ सध्या चाचणी टप्प्यात आहे. काही वापरकर्त्यांवर त्याची चाचणी देखील सुरू आहे.
लाँचिंगची तारीख अनिश्चित
आतापर्यंत कंपनीने सामान्य लोकांसाठी ते कधी रिलीज केले जाईल याची माहिती दिलेली नाही. ‘एक्स’ प्लॅटफॉर्मने 2023 मध्ये एक्रिप्टेड मेसेजिंग सेवा सुरू केल्यानंतर सुरुवातीला ही सेवा मर्यादित लोकांसाठी सुरू करण्यात आली होती.
व्हॉट्सअॅपशी होणार स्पर्धा
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध असलेल्या बहुतांश सर्व वैशिष्ट्यांचा समावेश ‘एक्सचॅट’मध्ये करण्यात येणार आहे. तथापि, व्हॉट्सअॅपमध्ये वापरकर्त्याला आपला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करावे लागते. मात्र, ‘एक्सचॅट’मध्ये मोबाईल नंबर कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही.
एंड टू एंड एक्रिप्शन म्हणजे काय?
एंड-टू-एंड एक्रिप्शन ही एक सुरक्षा प्रणाली असून त्याचा उद्देश पाठवणारा आणि प्राप्तकर्ता यांच्यामध्ये सुरक्षितपणे डेटा पाठवणे आहे. या प्रणालीमध्ये कोणीही डेटा डीकोड करू शकत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्याला मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज तुमच्या डिव्हाईसवर एक्रिप्ट होतो. त्यानंतर, तो इंटरनेटच्या मदतीने पुढे ट्रान्सफर केला जातो. अशा परिस्थितीत, मेसेज रिसीव्हरपर्यंत पोहोचताच तो डिक्रिप्ट होतो. हे फीचर व्हॉट्सअॅप, सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या मेसेजिंग अॅप्समध्ये उपलब्ध आहे.









