बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत कॅम्प क्लस्टर आणि कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी / उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धेत सेंट झेवियर, सेंट मेरीज व मराठी विद्यानिकेतन शाळेने वर्चस्व मिळविले आहे. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी कॅन्टोनमेंटचे सीईओ के. आनंद होते. कॉन्टोनमेंटच्या सभागृहात आयोजित बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे शहर गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, शहर पीईओ जे. बी. पटेल, कॅम्प माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर, कॅम्प क्लस्टरचे सीआरपी करलिंगण्णावर, कॅन्टोनमेंट मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा गावडे, उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका दिलशाद पारिशवाडी आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हसते बुद्धिबळाची चाल खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी शहर पीईओ जे. बी. पटेल बोलताना म्हणाल्या, विजय – पराजय ही शुल्लक गोष्ट आहे. खेळातून मन, मनगट आणि मेंदू यांचा चांगला विकास होतो. मुलांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन या स्पर्धा अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमात 27 शाळा सहभागी झाल्या होत्या. बुद्धिबळ खेळाने स्पर्धेची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरीदा बिश्ती व राजू कदम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार वाजीदा किल्लेदार यांनी मानले. बुद्धिबळ स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, मुलांच्या विभागात – अनिरुद्ध पाटील (सेंट मेरीज), अथनिश ताशिलदार (सेंट मेरीज), यश गुगरट्टी (मराठी विद्यानिकेतन), यश नंदगडी (सेंट झेवियर), महादेव पुजारी (एमव्हीएम). मुलींच्या विभागात – अप्रिता माडीवाले, वैष्णवी एच., रिया सबनीस (तिघीही सेंट झेवियर), आदिती कुलकर्णी (सेंट मेरीज), इमान संगोळी (एनपीईटी) यांनी विजेतेपद पटकाविले. वरील सर्व खेळाडू बेळगाव तालुकास्तरिय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेसाठी पंच म्हणून पी. एस. निडोनी, अँथोनी डिसोझा, महेश पी., मास्तीहोळी व नागराज भगवंतण्णावर यांनी काम पाहिले.









