वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विश्व टेबल टेनिस संघटनेतर्फे दुसरी विश्व टेबल टेनिस स्टार कंटेंडर चॅम्पियनशिप स्पर्धा गोवा येथे जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा 23 ते 28 जानेवारी दरम्यान होणार आहे. विश्व टेबल टेनिस फेडरेशनतर्फे 2019 साली पहिल्यांदा ही पुरूष आणि महिलांच्या व्यावसायिक टेबल टेनिसपटूंमध्ये स्पर्धा घेतली गेली होती. आता दुसऱ्यांदा ही स्पर्धा गोव्यात होणार आहे. सदर स्पर्धा सिक्स स्टार कंटेंडर मालिकेतील एक भाग आहे. सदर स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावरील अव्वल 30 टेबल टेनिसपटू सहभागी होत आहेत. जागतिक टेटे मानांकनातील आघाडीच्या पहिल्या 20 टेबल टेनिसपटूंपैकी 6 टेबल टेनिसपटू या स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे. सदर स्पर्धेतील विजेत्यासाठी एकूण बक्षिसाची रक्कम 250,000 अमेरिकन डॉलर्स ठेवण्यात आली असून विजयी खेळाडूंना मानांकन गुण दिले जातील. सदर माहिती अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे सरचिटणीस कमलेश मेहता यांनी दिली. सदर स्पर्धा स्टुफा स्पोर्ट्स अॅनेलेटिक्स आणि अल्टिमेट टेबल टेनिस यांच्या संयुक्त यजमानपदाने घेतली जाणार आहे.









