मंत्री गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट
प्रतिनिधी/ सातारा
गर्दी जमवणारे पाठवून दिले आमच्याकडे आणि आता बोलतात. तडीपारी, मर्डर सारख्या खोटय़ा केसेस टाकल्या आमच्यावर. एकेक वर्ष जेलमध्ये काढले आम्ही. आज जी माणसं वल्गना करतात. ती माणसं साधी नगरसेवक होऊ शकली नाहीत, अशा शब्दात संजय राऊत यांचे नाव न घेता खरपूस समाचार मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. पुढे त्यांनी मला तर असे वाटते की साहेबांना चुकीचे फिडींग करण्यामध्ये याच चारपाच डाकू लोकांचे काम होते, अशा शब्दात गौप्यस्फोट केला.
साताऱयात जलजीवन योजनांचा ई भूमीपूजन सोहळा पार पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांना साताऱयातल्या पत्रकारांनी गाठले अन् बोलण्याचा आग्रह केला. पत्रकारांच्या एका प्रश्नावर खरमरीत उत्तर देत ते म्हणाले, त्या गोष्टीला सहा महिने झाले, नवीन पिक्चर येतो, नवा सिन होतो, ती स्टोरी जुनी झाली. जे झाले ते झाले, मंत्री बसले, मुख्यमंत्री बसले. कशावर बसले… कशावर बसले, कसे बसले या जुन्या कडीला ऊत देण्यात काय अर्थ नाही. आम्हाला विकास करायचा आहे. त्यावर दुसऱया पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, गर्दी जमवणारे आमच्याकडे पाठवून दिले. आम्हाला तडीपारी, मर्डरसारख्या खोटय़ा केसेसमध्ये अडकवले. जेलमध्ये वर्ष वर्ष आम्ही लोक राहिलेलो आहोत आणि आज तुम्ही आम्हाला वलग्ना करताय, कधी नगरसेवक न झालेला माणूस वेगवेगळया टिका करतोय. मला तरी असे वाटते, उद्धव साहेबांना चुकीचे फिडींग करण्यामध्ये हे चार पाच डाकू लोक होते. डाकू शब्द चुकीचा होईल, असंसदीय अशी वाच्यता होईल. ह्यांच्यासारखे चुकीचे लोक सांगणारे होते म्हणून आज या पक्षाचे असे दिवस आलेले आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी करत संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. एका पत्रकाराने आदित्य ठाकरे यांच्या हल्याचा प्रश्न छेडला असता त्यावर ते पोलीस चौकशी सुरु आहे. असा हल्ला कोणावर होऊ नये, असे सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱयांची फाईल अर्थखात्याकडे
राज्यात स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कर्मचाऱयांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. अनेक कर्मचाऱयांना पगार नाही. आपले आयुष्य याच विभागात घालवले तरीही कर्मचारी अजूनही कायम नाहीत. त्याबाबत प्रश्न छेडला असता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, कंत्राटी कर्मचाऱयांची फाईल अर्थ खात्याकडे आहे, असे स्पष्ट केले.