डीजे लावलेल्या मंडळांना चुकीचे मार्गदर्शन : अनेक मंडळांमध्ये वादावादी-हाणामारीच्या घटना, कार्यकर्त्यांना भोगावा लागला परिणाम
बेळगाव : श्री शिवजयंती उत्सव मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असते. पोलीस यंत्रणेची तर या काळात मोठी धावपळ होते. गुरुवारी रात्री मिरवणूक सुरू असताना पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक मंडळांमध्ये वादावादी, हाणामारीच्या घटना घडल्या. यावरून पोलीस अधिकाऱ्यांना नेमके काय साधायचे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हाणामारीत दहाहून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहेत. ज्या मंडळांनी डीजे लावला आहे, त्यांनी शनिवार खूटवरून गणपत गल्लीत जायचे व ज्यांनी जिवंत देखावे सादर केले आहेत, त्यांनी खडेबाजारमार्गे वळावे असे ठरलेले असताना काही पोलीस अधिकाऱ्यांनी डीजे लावलेल्या मंडळांना गणपत गल्लीमार्गे न पाठवता थेट खडेबाजारमध्ये वळविले. त्यामुळे मध्यरात्री 12 पासून पहाटे चारनंतरही खडेबाजार रोडवर वादावादी व गोंधळाची स्थिती होती.
चव्हाट गल्लीसह सजीव देखावे तयार केलेली अनेक मंडळे ठिकठिकाणी थांबून आपला देखावा सादर करीत होती. मध्येच उपनगरातील डीजे लावलेली मंडळे घुसविण्यात आली. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. ‘मोठ्या प्रमाणात खर्च करून आम्ही सजीव देखावा तयार केला आहे. डीजेमुळे देखावा सादर करण्यात व्यत्यय येतो आहे. पोलिसांनी पाठवले तरी किमान तुम्ही तरी आवाज बंद करा’, असा पवित्रा सजीव देखावा तयार केलेल्या काही मंडळांनी घेतला. डीजे लावलेली तीन ते चार मंडळे गणपत गल्लीऐवजी खडेबाजारमध्ये वळविण्यात आली होती. त्यांना पुन्हा गणपत गल्लीमार्गे जाण्याचा द्रविडी प्राणायाम करावा लागला. हा गोंधळ सुरू असतानाच हंस टॉकीज रोड, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली परिसरात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. अशावेळी सौम्य लाठीमार करून पोलिसांनी तरुणाईला पिटाळले आहे. काकतीवेस रोडवरही सौम्य लाठी हल्ला झाला.
मारुती गल्ली परिसरात झालेल्या हाणामारीत सूरज (वय 34), विकास (वय 40), राकेश (वय 30) सर्व राहणार कंग्राळी खुर्द हे तरुण जखमी झाले. तर गणपत गल्ली परिसरात शहापूर येथील संदेश (वय 23) या तरुणाला मारहाण करण्यात आली. हंस टॉकीज रोडवरही तुंबळ हाणामारीची घटना घडली. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दहाहून अधिक तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. लाठी-बोथाटी फिरवताना त्यामधील ठिणग्या अंगावर पडून शहापूरचा एक युवक जखमी झाला आहे. शहापूर परिसरात पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ज्या ज्या मंडळांनी सजीव देखावे तयार केले होते, तेथे गोंधळाची स्थिती नव्हती. पण ज्यांनी डीजेचा गोंगाट सुरू केला होता, तेथे डान्स करताना वादावादी होऊन अनेकांनी आपल्या अंगावरील कपडे फाडून घेतले आहेत. काकतीवेस रोडवरही एका तरुणाला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
एकाही प्रकरणाची नोंद नाही
गुरुवारी रात्री झालेल्या चित्ररथ मिरवणुकीत हाणामारीच्या घटनेतील जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलवर उपचार करण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल बाहेरही गर्दी जमली होती. शुक्रवारी रात्री खडेबाजार पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता या घटनांपैकी एकाही प्रकरणाची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मिरवणूक शांततेत पार पडल्यामुळे शुक्रवारी दिवसभर अधिकारी व पोलीस रिलॅक्स मूडमध्ये होते. काही अपवाद वगळता कोणीच अधिकारी पोलीस स्थानकाकडे फिरकले नाहीत.
शुक्रवारी सकाळी सहानंतर मंडळांना धाडले माघारी
पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 6 पर्यंत मिरवणुकीसाठी वेळ निश्चित करून दिली होती. सहा वाजता अनेक मंडळातील चित्ररथ वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये होते. तेथूनच त्यांना सहानंतर माघारी धाडण्यात आले. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश, निरंजन राजे अरस आदी अधिकारी मिरवणूक मार्गावर सातत्याने फेटफटका मारत होते. हाणामारीच्या घटनांनंतर त्या त्या मंडळांना डीजे बंद पाडण्यास भाग पाडण्यात आले.









