खासदार इराण्णा कडाडी यांच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : बेळगाव ते पुणेपर्यंत रेल्वेलाईनचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच बेळगावकरांच्या अपेक्षेनुसार वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. हुबळी नैर्त्रुत्य रेल्वे विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य खासदार इराण्णा कडाडी यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी इराण्णा कडाडी यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बेळगाव-पुणे दरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची गरज त्यांना पटवून दिली. त्यानंतर बेळगाव-पुणे दरम्यानचे रेल्वेलाईन विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. यावेळी बेळगाव कोअर डेव्हल्पमेंट ग्रुपचे शैलेश यलमळ्ळी, अश्विन पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे योजनांसंबंधी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. सध्याचे प्रस्ताव पाहून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाहीही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.









