उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांचे प्रतिपादन
बेळगाव : सध्याच्या धावत्या युगामध्ये कायद्यावर पुस्तक लिहिणे ही बाब अत्यंत कठीण आहे. मात्र, बेळगावातील वकील डॉ. एस. बी. शेख यांनी या धावपळीमध्येही पुस्तके लिहिली, ही बाब बेळगावसाठी उल्लेखनीय आहे. अशा पुस्तकांचे वाचन नवीन होतकरू वकिलांबरोबरच इतर वकिलांनीही करणे गरजेचे आहे. कारण वाचनामुळेच आपले ज्ञान वाढते. असे मत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांनी केले. ज्येष्ठ वकील डॉ. एस. बी. शेख यांनी लिहिलेल्या ‘वुई अँड द लॉ’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, डॉ. एस. बी. शेख यांनी अनेक वकील व न्यायाधीशांच्या कार्याबाबतची माहिती या पुस्तकामध्ये नमूद केली आहे, ती महत्त्वाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांवर प्रेम होते. पुस्तकाला कोणीही धक्का लावला तरी ते त्यांना सहन होत नव्हते. याबाबत अनेक किस्से न्या. प्रसन्ना वराळे यांनी कथन केले.
नवनवीन पुस्तकांची निर्मिती करावी
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कृष्णा दीक्षित म्हणाले, मी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी डॉ. एस. बी. शेख यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. त्यांचा आदर्श इतर वकिलांनी घ्यावा आणि नवनवीन पुस्तकांची निर्मिती करावी. डॉ. एस. बी. शेख यांनी पुस्तक लेखनाचा उद्देश सांगून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. बार असोसिएशन, खानापूर बार असोसिएशन यांनीही सहकार्य केले, त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. ज्येष्ठ वकील डी. एम. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मीदेवी यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.









