कुद्रेमनी येथे 19 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात : साहित्यप्रमेंची संमेलनाला लक्षणीय उपस्थिती
बेळगाव : ‘बुडती है जन देखवेना डोळा’ या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे आजची परिस्थिती झाली आहे. शिक्षित तरुणांना काम नाही म्हणून त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, जगण्याची शाश्वती राहिली नाही, भविष्य अंध:कारमय दिसत असल्याने आत्महत्या वाढत आहेत. तरुण हिंसेकडे वळत आहेत. राजकारणाला गुन्हेगारीचा तोंडवळा आहे. अशा बिकट परिस्थितीत लेखकांनी लेखणीचे हत्यार करावे आणि समाजाला परिवर्तनाची वाट दाखवावी, असे मत साहित्यिक दि. बा. पाटील यांनी व्यक्त केले.
श्री बलभीम साहित्य संघ कुद्रेमनी आयोजित 19 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. कुद्रेमनीच्या कै. परशुराम मिनाजी गुरव साहित्यनगरीमध्ये कै. ईश्वर कल्लाप्पा गुरव व्यासपीठावर झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन मार्कंडेय साखर कारखान्याचे अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर अॅड. शाम पाटील, प्रा. चंद्रकांत पोतदार, अॅड. सुधीर चव्हाण, बाळाराम पाटील, विनायक व माणिक होनगेकर, अशोक कांबळे, साहित्य संघाचे अध्यक्ष शिवाजी मुरकुटे, विनायक मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष दि. बा. पाटील म्हणाले, मराठी व कानडी या दोन्ही भाषांचे संबंध दृढ आहेत. त्यांची नाळ पंढरीच्या विठ्ठलाच्या पायाशी आहे. त्यामुळे सरकारने मराठी भाषिकांना सापत्न वागणूक देऊ नये. त्यांचे भावनिक व भाषिक स्वातंत्र्य त्यांना मिळायला हवे. कोणतीही भाषा दडपशाहीने रोखता येत नाही. साहित्य संमेलने ही मराठी भाषेचा अविभाज्य घटक असून मराठी संस्कृतीचे ते संचित आहे. त्यामुळे संमेलने झाली पाहिजेत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु यापूर्वी तिच्यावर अन्य भाषांचे आक्रमण झाले. म्हणून छत्रपती शिवरायांनी मराठी राज्य व्यवहार कोष तयार केला. त्यानंतर इंग्रजीचा प्रभाव आला व तो कायम राहिला. आज मराठी भाषेत इंग्रजीची भेसळ साहित्यिकांनी टाळायला हवी. नव्या युगाचे सामर्थ्य पेलण्याची शक्ती मराठीमध्ये आहे. परंतु मराठीचे अपत्य दुबळे झाल्याने इंग्रजीचा प्रभाव वाढतो आहे. इंग्रजी हे वाघिणीचे दूध असले तरी आईच्या दुधाचे मोल आपण विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
समाज व साहित्य यांचा निकटचा संबंध आहे. 1930 नंतर तरुण शहराकडे वळले. कार्लमार्क्समुळे कामगार चळवळी उभ्या राहिला. 80 नंतर जागतिकीकरणामुळे सर्व क्षेत्रात बदल झाले. मराठी संतांनी समाजाला वाट दाखविली. कोणत्याही साहित्याच्या तळाशी वेदना असते. ही वेदना संतांनी सोसली. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान पुढे ठाकले आहे. परिस्थिती बिघडत चालली आहे. अशा वेळी लेखकांनी लेखणीचे हत्यार केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जात, धर्म यांच्या भिंती राजकारणाने भक्कम करून धर्मामध्ये सुरुंग पेटवला. पण त्या पलीकडे जाऊन लेखकांनी माणूसपण महत्त्वाचे हे पुन: पुन्हा साहित्यामधून सांगितले पाहिजे. आज स्वातंत्र्य आणि समता जाती-धर्माच्या दावणीला लावली आहे. ती तोडण्याचे सामर्थ्य लेखकांमध्ये हवे. लेखक हा समाजाचा तिसरा डोळा आहे. म्हणून तो नेहमी समाजासोबत हवा. माणुसकीचा हरवलेला सामाजिक, सांस्कृतिक चेहरा पुन्हा सुंदर करण्याचे काम साहित्यच करू शकणार आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आर. आय. पाटील यांनी, साहित्यिकांनी दिल्लीला धडकावे व सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आपली ताकद पणाला लावावी, असे सांगितले. मोबाईल दूर ठेवून मुलांच्या हाती पुस्तके आली पाहिजेत. त्यांना मादक पदार्थांच्या विळख्यातून सोडविले पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रारंभी विद्यार्थिनींनी ‘तूच जोतिबा’ हे क्रांतिगीत सादर केले. त्यानंतर त्यांनी स्वागतगीत सादर केले. शिवाजी मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले. मातीसाठी आणि मराठीसाठी जगावे असे आवाहन त्यांनी केले. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मराठा को-ऑप. बँक, जिजामाता बँक, कुद्रेमनी पीकेपीएस सोसायटी, भाग्यलक्ष्मी सोसायटी कुद्रेमनीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील अनेक मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुहास एम. गुरव यांनी केले.
बहारदार कवी संमेलन
‘इथे पाप भारी झाले, सत्याला नाही वाली’
सोड वीट आता, धाव घे विठू माऊली’
या आणि अशा अनेक महत्त्वाच्या कविता सादर करून संमेलनातील कवींनी हे सत्र यशस्वी केले. या सत्रामध्ये संजीव वाटूपकर, बसवंत शहापूरकर, प्रा. अशोक अलगोंडी, सीमा कणबरकर यांनी भाग घेतला. प्रा. चंद्रकांत पोतदार अध्यक्षस्थानी होते. संजीव यांनी ‘सनई चौघडा आज दारी घुमू दे, माझ्या ताईचे आज लगीन होऊ दे’ ही कविता सादर केली. तर ‘इथे पाप भारी झाले’ या कवितेतून सीमा यांनी ‘शस्त्र हाती घ्या लेकींनो तुम्ही चंडिका, तुम्ही काली’ असे आवाहन केले. अशोक अलगोंडी यांनी ‘यंदा मिरग करा, बराच उशीर आला, आला कधी गेला कधी कळला नाही’ ही तसेच शिवरायांवर कविता सादर केली. बसवंत शहापूरकर यांनी ‘कशी फळाला आली पुण्याई’ व ‘वृद्धाश्रम’ ही कविता सादर केली. सांगलीच्या दीपक स्वामी यांनी ‘कसाबाच्या घरी लोकशाही बांधतो, पालीच्या या घरी कसा विंचू नांदतो’ यासह ‘सोनी’ ही कविता सादर केली. चंद्रकांत पोतदार यांनी ‘खडाचा संसार’ या कवितेतून ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा सादर केल्या. तत्पूर्वी साईराज गुरव याने कथा सादर केली.
‘माझी मैना’ लावणीची आठवण
सीमाप्रश्नी छगन भुजबळ यांनी केलेल्या आंदोलनावेळी आपण बेळगावला आलो होतो. कोल्हापूरच्या रास्ता रोकोमध्येही आपला सहभाग होता. हा प्रश्न लवकर सुटायला हवा. पण सध्या तो न्यायप्रविष्ठ असल्याने आपल्याला वाट पहायला हवी, असे सांगून अध्यक्षांनी अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना’ या लावणीची आठवण करून दिली.
भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडी सोहळा
भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडी सोहळ्याने कुद्रेमनी येथील श्री बलभीम संघ आयोजित यंदाच्या 19 व्या मराठी साहित्य संमेलनाची श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरापासून सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी मंदिरातील विठ्ठल-रखुमाई मूर्तीपूजन विष्णू जांबोटकर, प्रकाश गुरव दांपत्यांच्या हस्ते झाले. पालखीचे पूजन अर्जुन राजगोळ्ळी, प्रशांत सुतार, ग्रंथ पूजन निंगाप्पा पाटील, कृष्णा धामणेकर, दांपत्यांनी केले. यानंतर ग्रा. पं. सदस्य शांताराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पेडणेकर सोनोली दांपत्यांच्या हस्ते झाल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला.
टाळ-मृदंग, अभंगांचा गजर, महिलांचा हरिपाठ, वारकरी वेषातील भजनी मंडळी, मराठमोळ्या वेषात हातात ध्वज घेऊन सहभागी झालेले विद्यार्थी, डोईवर तुलसी कलश घेऊन सहभागी झालेल्या महिला हे दृष्य मराठी संस्कृती, परंपरा व अस्मितेचे एकात्म दर्शन घडवत होते. लक्ष्मी गल्ली, चव्हाटा गल्लीतून पुढे आल्यानंतर गावच्या वेशीतील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन एसडीएमसी माजी अध्यक्ष भैरू आनंदाचे व संतोष गुरव यांच्या हस्ते झाले. यानंतर पालखी सोहळा संमेलनस्थळी दाखल झाला. यावेळी परशराम मिनाजी गुरव साहित्यनगरीचे उद्घाटन डॉ. विजय पाटील, एस. एम. इलेक्ट्रीकचे मालक मारुती पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यानंतर संमेलन नगरीतील कै. परशराम गुरव स्मारकाचे पूजन भाग्यलक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष अर्जुन जांबोटकर व शिक्षणप्रेमी जकाप्पा पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावरील संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन केपीएस सदस्य परशराम पाटील, तुकाराम महाराज प्रतिमा पूजन मारुती सुतार, शिवप्रतिमा पूजन संजय पाटील, म. फुले प्रतिमा पूजन एम. बी. शेडबाळे, सावित्राबाई फुले प्रतिमा पूजन के. एल. गुंजीकर, राजर्षी शाहू महाराज प्रतिमा पूजन सदानंद धामणेकर, बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन राहुल कदम यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली. ग्रंथदिंडीचे समालोचन जी. जी. पाटील यांनी केले. सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रा. पं. माजी सदस्य नागेश राजगोळकर व सुहास गुरव यांनी केले. व्यासपीठावर शिक्षणक्षेत्रातील सेवानिवृत्त व्यक्तींचा, मराठा बँक बेळगाव, जिजामाता बँक बेळगाव, कुद्रेमनी पीकेपीएस सोसायटी, भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व इतर अधिकारी व्यक्तींचा साहित्य संघाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.









