ढवळी फोंड्यात 16 वे मराठी प्रागतिक साहित्य संमेलन उत्साहात
फोंडा : वाचन संस्कृतीस चालना देण्यासाठी साहित्य संबंधीत कार्यक्रमात अधिकाधिक युवकांना सहभागी करून घेणे आयोजकांची जबाबदारी स्वीकारावी. साहित्य समृद्ध आहे, कसदार आहे आणि साहित्याचा दर्जा टिकविण्याची जबाबदारी आजची पिढी सर्वार्थाने पार पाडते हे सुलक्षण मानायला हवे असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी उद्घाटक या नात्याने व्यक्त केले. प्रागतिक विचार मंच गोवा या संस्थेने आयोजित केलेल्या 16 व्या मराठी प्रागतिक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष विठ्ठल गावस, कार्याध्यक्ष सुनील सावकार, स्वागताध्यक्ष डॉ. अनिता तिळवे, खास निमंत्रित उद्योजक मोहनदास बखले, संस्थेचे अध्यक्ष रमेश वंसकर तसेच उपाध्यक्ष माधुरी उसगावकर उपस्थित होत्या. ढवळी-फोंडा येथील भास्कर सभागृहात झालेल्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्री. ढवळीकर यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष श्री. गावस म्हणाले की नाट्यानिर्मिती हा विषयही गोव्यातूनच सुरु झाल्याचे संदर्भ सापडतात तर पुढे म्हणाले की केवळ प्रतिभा असून चालणार नाही तर साहित्याकडे साधना आणि तपश्चर्या करण्याची क्षमता हवी. गोव्यात साहित्यिकांचा वानवा नाही मात्र मराठी साहित्याचा दर्जा सांभाळायला हवा. श्री. ढवळीकर यांच्याहस्ते रमेश वंसकर यांचे ‘आईस्क्रिमच तळं’ हा बाल काव्य संग्रहृ विनोद नाईक यांचा ‘गीत गंगा’ हा काव्यसंग्रहृ डॉ. रामनाथ गावडे यांचा ‘उंच घे भरारी’ हा काव्यसंग्रह आणि प्रसाद सावंत यांच्या ‘तेजस्वी तारा’ या नाट्यासंग्रहाचे प्रकाशन श्री. ढवळीकर यांच्याहस्ते झाले. साहित्य क्षेत्रातील पाच प्रतिभावंत कालिदास मराठे, बाळ सप्रे, मनोहर जोशी, प्रकाश तळवडेकर व लक्ष्मी जोग यांचा उद्घाटक श्री. ढवळीकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जयवंत आडपईकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनिता तिळवे यांनी स्वागत केले. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन तर रमेश वंसकर यांनी आभार मानले. तत्पूर्वी प्रकाश तळवडेकर पुरस्कृत ‘स्वर प्रकाश’ हा गायनाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये पं. विठ्ठल खांडोळकर व श्रीकांत शिरोडकर यांनी सहभाग दर्शविला.









