नागसाप म्हटले की आपल्या अंगावर भीतीमुळे काटा उभा राहणे आणि आपला थरकाप उडणे स्वाभाविक आहे. कारण नाग हा सर्वात विषारी साप मानला जातो. नागसापाच्या 21 भिन्न भिन्न प्रजाती आहेत. तरी त्या सारख्याच घातक आहेत. त्यातील किंग कोब्रा किंवा नागराज ही प्रजाती सर्वात विषारी मानली जाते. नागराजाचा दंश झाला, तर अवघ्या काही सेकंदांमध्ये मृत्यू निश्चित असतो.
या प्रजातीच्या घातकपणामुळे सर्वजण शक्यतो त्यांच्यापासून दूर पळण्याचाच प्रयत्न करतात. केवळ मानवच नव्हे, तर वनांमधील इतर प्राणी किंवा प्रजातीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून असतात. तथापि, अलिकडच्या काळात इन्स्टाग्रामावर एक व्हिडीओ आपल्याला दिसतो. त्यात एक व्यक्ती एकाच वेळी पाच नागराजांसमवेत जणू काही कुस्तीचा खेळ खेळताना दिसून येतो. या व्हिडीओला असंख्य लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्यक्तीचा साहसासंबंधी आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्याच्या जवळ जाण्यासही बहुतेक जण घाबरतात अशा सापांना ही व्यक्ती सहजासहजी नुसत्या हातांनी हाताळताना दिसून येते. अनेकांनी या व्हिडीओवर अविश्वासही व्यक्त केला आहे. तथापि, तपासणीअंती तो खरा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या व्यक्तीची माहिती घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येते. या व्हिडीओत त्याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, तो ज्या सहजतेने साक्षात यमदूत असणाऱ्या या नागसापांशी खेळताना दिसत आहे, त्यावरुन तो सर्पतज्ञ असावा, असे अनुमान काढण्यात येत आहे. तो ज्या सापांशी खेळताना दिसतो, ते माणसाळलेले नाहीत. नागसाप कधीही माणसाळत नाहीत. तसेच त्यांचे विषाचे दात काढण्यातही आलेले नाहीत. तरीही त्यांच्याशी तो करत असलेले खेळ पाहून पाहणारे अक्षरश: चीत होत आहेत.









