बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती कुस्ती संघटना बेळगाव यांच्यावतीने 24 जानेवारी रोजी महिला व युवकांच्या प्रोत्साहनपर भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय एकमताने बैठकीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी होते. सदर बैठक राष्ट्रीय कुस्ती कोच मारूती घाडी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मंडळाचे सरचिटणीस संतोष होंगल यांनी केले. सुरूवातीला संघटनेचे माजी अध्यक्ष व सदस्य कै. वैजनाथ भोगण व विजय चिंगटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर बैठकीला सुरूवात करण्यात आली. संघटनेच्या वतीने दरवर्षी होतकरू मल्लांच्या भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षीही 24 जानेवारी रोजी भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मारूती घाडी यांनी सदर स्पर्धेची माहिती दिली. सदर कुस्ती स्पर्धा ही महिलांसाठी व युवा पैलवानांसाठी वजनी गटात आणि बेळगावमध्ये पहिल्यांदा मॅटवर घेण्याचे निश्चित करण्यात आले. सदर स्पर्धा ही दोन दिवस आयोजित करण्यात येणार आहे. याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी बेळगावचे निवृत्त क्रीडाधिकारी विलास घाडी, अशोक हलगेकर आणि उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी विनोद चौगुले, मनोहर गावडे, अतुल शिरोळे, संतोष होंगल, मल्लाप्पा हिंडलगेकर, मोनाप्पा मोरे, हिरालाल चव्हाण, नवरत्नसिंग मनोज बिर्जे आदी उपस्थित होते.









